ऑनलाइन लोकमतकुरूंदा, दि. 28 - वसमत तालुक्यातील कोठारी येथे पती-पत्नीने आत्महत्या केल्याने कुटुंबातील तीन बालके उघड्यावर आल्यामुळे गाव सुन्न झाले आहे. समाजमन हळहळले आहे. या लहान बालकांना शासनाने आर्थिक मदत द्यावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली. कोठारी येथे मयत बालाजी माधवराव पतंगे व वर्षा बालाजी पतंगे या दाम्पत्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली. संवेदनशिल मनाचे लोक तर नि:शब्दच झाले. इतरांना किरकोळ वाटावे मात्र आर्थिक आपबितीमुळे पतंगे कुटुंबियांसमोरचा प्रश्न होता तो पितरांना जेवू घालण्याची परंपरा पूर्णत्वास नेण्याचा. यासाठी जवळ पैसे नसल्याने दोघांत कुरबूर झाली. दीड एकरच शेत अन् त्यात कापूस, ज्वारी पेरली. अतिवृष्टीमुळे त्याचेही काही खरे दिसत नव्हते. मराठवाडा ग्रामीण बँकेचे ३५ हजारांचे कर्जही घेतले होते. वाद सुरू असताना या सर्व बाबींचा उहापोह झाला. सर्व बाबी चिंतेच्या खाईत ढकलणाऱ्याच असल्याने पत्नीने आत्महत्येसाठी विहिरीत उडी घेतली. ही घटना पतीला कळाल्यानंतर त्यानेही त्याच विहिरीत उडी घेतली. पती-पत्नीचे प्रेत बाहेर काढल्यानंतर गिरगाव रूग्णालयात या प्रेताचे शवविच्छेदन केले. मंगळवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास एकाच चितेवर पती-पत्नीला अग्निमुख देण्यात आले. या घटनेमुळे ग्रामस्थांची मने हेलावली अन् हादरूनही गेली. छोट्याशा खोपटात अगदी तोकड्या साहित्यावर चालणाऱ्या संसाराला भयाण रुप आले. सुमित पतंगे (६ वर्ष), स्वराज पतंगे (२) तर सुरज पतंगे (७ महिने) हे बालके उघड्यावर आली आहेत. यातील सुमित पहिली वर्गात आहे. मयताला तीन भाऊ व वयोवृद्ध आई आहे. ते वेगवेगळे राहतात. बालकांची चिंता ग्रामस्थांना लागली आहे. शासनाने या बालकांना पाहून तरी मदत द्यावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. या गावाला सदर प्रतिनिधीने भेट दिली असता गावात शोकाकूल वातावरण होते. या बालकाच्या शिक्षणाची जबाबदारी योगेश्वरी प्रतिष्ठाणच्या वतीने घेतल्याचे समजते. आता छत्र हरवलेल्या या बालकांना भविष्यात अडचणी येवू नयेत, यासाठी मदतीचे हात पुढे यावेत, अशी अपेक्षाही ग्रामस्थांनी व्यक्त केली.
दाम्पत्याच्या आत्महत्येमुळे गाव सुन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2016 8:48 PM