दासगाव : मुंबई-गोवा महामार्गावर मोहोप्रे गावाजवळ अपघाती वळणावर रसायन वाहून नेणारा टँकर पलटी झाल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक किमान तीन तास ठप्प झाली. त्यामुळे अवजड वाहने वगळता छोटी वाहने महाड शहरातून वळवण्यात आली.मोहोप्रे गावाजवळ असलेल्या एका अवघड वळणावर सोमवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास महाड औद्योगिक वसाहतीमधील रसायन वाहतूक करणारा टँकर पलटी झाला. लक्ष्मी आॅर्गनिक्स या कारखान्यातील इथाईल अॅसिटेट हे रसायन मुंबई येथे नेत असताना हा अपघात झाला. टँकर पलटी झाल्यानंतर टाकीच्या एका बाजूने गळती सुरू झाली. मात्र इथाईल अॅसिटेट हे ज्वलनशील रसायन असले तरी हवेच्या सान्निध्यात आल्यानंतर ते नष्ट होत होते. यामुळे कोणताही धोका नसल्याचे लक्ष्मी केमिकल्स कंपनीचे अधिकारी संदेश महागावकर यांनी सांगितले. या अपघातात चालक लाला यादव (४५, रा. मध्य प्रदेश) हे गंभीर जखमी झाले आहेत. गेल्या महिन्यात याच कंपनीचा अॅसिटीक अॅसिडचा टँकर दासगाव गावाजवळ पलटी झाला होता. (वार्ताहर)
मुंबई-गोवा महामार्गावर टॅँकर उलटल्याने वाहतूक तीन तास ठप्प
By admin | Published: January 24, 2017 4:11 AM