लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : घाटकोपर मेट्रोमध्ये बुधवारी सकाळी पिक-अवरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मेट्रो सेवा विस्कळीत झाली. तर पश्चिम रेल्वेसह मध्य रेल्वेची सेवाही विस्कळीत झाली. घाटकोपर ते वर्सोवा मार्गावर धावणारी मेट्रो सकाळी ८ वाजून ५ मिनिटांनी बंद पडली. डी.एन. नगर आणि वर्सोवा स्थानकांदरम्यान ओएचईमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे अंधेरी ते वर्सोवा ही सेवा ठप्प झाली होती. दरम्यान १२ स्थानकांपैकी ९ स्थानकांवर सुरळीत सेवा पुरवल्याचा दावा मुंबई मेट्रो वनच्या वतीने करण्यात आला आहे. ओएचईमध्ये दुरुस्ती केल्यानंतर ९ वाजून ३५ मिनिटांनी घाटकोपर ते वर्सोवा मेट्रो सेवा सुरळीत झाली. ‘पिक-अवर’ असल्यामुळे घाटकोपर ते अंधेरी मार्गावरील गर्दी नियंत्रित करण्यासाठी नियमित वेळेपेक्षा अधिक फेऱ्या चालवण्यात आल्या. दुसरीकडे वलसाड पॅसेंजरचा डबा बोईसर स्थानकात घसरला. यामुळे पश्चिम रेल्वेवरील लोकल उशिराने धावत होत्या. शिवाय माटुंगा रोड स्थानकात पॉइंट फेल्यूअर या तांत्रिक बिघाडामुळे दुपारी तीनच्या सुमारास लोकल सेवा लोकल सेवा विस्कळीत झाली. बोईसर आणि माटुंगा रोड येथील तांत्रिक बिघाडाचा परिणाम परतीच्या लोकलच्या वेळापत्रकावरही झाला. त्यामुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला.
तांत्रिक बिघाडामुळे मेट्रो, लोकल सेवा विस्कळीत
By admin | Published: June 30, 2017 1:50 AM