विधानसभेला अर्वाच्च भाषेत अजित पवारांनी टीका केल्याचा व पाडल्याचा राग मनात धरून असलेले शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी लोकसभेला पवार कुटुंबात एकटे पडलेल्या अजित दादांना खिंडीत गाठण्यासाठी कंबर कसली आहे. आज ते बारामती लोकसभा मतदारसंघातील हर्षवर्धन पाटलांना भेटणार आहेत. अशातच शिवतारेंनी पक्षविरोधी कृत्ये केल्याने त्यांची हकालपट्टी करण्याचा दबाव शिवसेना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर वाढू लागला आहे.
अजित पवारांनी शिवतारेंवर भाष्य करताना महायुतीत वातावरण बिघडायला नको म्हणून शांत असल्याचे म्हटले होते. यापूर्वी पवारांनी फडणवीस यांची भेट घेत बारामतीत शिवतारेंच्या बंडाची तक्रार केली होती. यानंतर शिंदे यांनी शिवतारेंना बोलवून समज दिली होती. तरीही शिवतारे लोकसभा लढविण्यावर ठाम असून उघडपणे मोर्चेबांधणी, गाठीभेटी घेत आहेत. अखेर शिवतारेंवर कारवाई करण्याच्या सूचना शिवसेनेत आल्या असल्याचे वृत्त होते. अद्याप त्यांच्यावर कारवाई केलेली नाही.
आज शिवतारे भाजपाचे नेते हर्षवर्धन पाटील यांची भेट घेणार आहेत. हर्षवर्धनही अजित पवार विरोधक आहेत. त्यांनी मुलीसाठी बारामती लढविण्याची तयारी केली होती. त्यांनादेखील भर मंचावरून अर्वाच्च भाषेत बोलणे, मतदारसंघात फिरू न देण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. काही दिवसांपूर्वीच अजित पवारांच्या भेटीनंतर फडणवीसांनी भेटीला बोलावले होते. यावेळी त्यांनी अजित पवारांसोबतही बैठक घ्या असे सांगितले होते.
यावर शिवतारेंनी एकनाथ शिंदे यांची माझ्यामुळे गेले दोन-चार महिने अडचण होत आहे. माझे आणि त्यांचे घनिष्ट नाते आहे. महायुतीत जागा सुटणार नाही, त्यांना अडचण आहे. मला लोकसभा लढवायची आहे. त्यांना अडचण आहे, म्हणून मी बाहेर पडतोय. आमची २५ वर्षांची सोबत आहे ती असेलच. मी लोकसभेत विजयी होणार, असे शिवतारे यांनी सांगितले आहे. टीव्ही ९ ला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी हे मत व्यक्त केले आहे.
माझ्यावर कारवाईच्या बातम्या आहेत. पुढे बघुया काय होते ते. शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवावी आणि जिंकावी अशी मागणी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी बारामतीची जागा सोडवून आणली तर आनंदच होईल, असेही शिवतारे म्हणाले आहेत.