काँग्रेसमधील खदखद बाहेर! आशिष देशमुख राजीनामा देणार; पक्षातंर्गत नाराजी उफाळली
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2022 11:29 AM2022-05-31T11:29:08+5:302022-05-31T11:35:28+5:30
इम्रान प्रतापगढी हे कव्वाल, शायर असून शिर्डीत होणाऱ्या नव संकल्प शिबिरात त्यांचे कव्वालीचे कार्यक्रम ठेवा असा खोचक टोलाही आशिष देशमुख यांनी स्वपक्षाला दिला आहे.
नागपूर - राज्यसभेच्या उमेदवारीवरून काँग्रेसमधील खदखद अखेर बाहेर पडली आहे. काँग्रेसनं महाराष्ट्रातून इम्रान प्रतापगढी(Imran Pratapgadhi) यांना उमेदवारी दिल्याने पक्षात अनेक जण नाराज असल्याचं समोर आलं. काँग्रेस नेत्या नगमा यांनी १८ वर्षाची तपस्या कमी पडली अशा शब्दात नाराजी व्यक्त केली. आता काँग्रेसचे प्रदेश महासचिव माजी आमदार आशिष देशमुख यांनी राजीनामा देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीतील नाराजी उफाळून आल्याचं चित्र काँग्रेसमध्ये पाहायला मिळत आहे.
डॉ. आशिष देशमुख(Dr Ashish Deshmukh) काँग्रेसमध्ये पदाचा राजीनामा देत असले तरी पक्षात राहून काम करणार असल्याचं त्यांनी जाहीर केले आहे. महाराष्ट्रात अनेक सक्षम उमेदवार असताना पक्षाने राज्याबाहेरचा उमेदवार दिल्याने ही नाराजी आहे. भाजपातून बाहेर पडल्यानंतर देशमुखांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यासाठी त्यांनी आमदारकीही पणाला लावली. खुद्द पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी देशमुखांना राज्यसभेच्या जागेचं आश्वासन दिले होते मात्र ते पाळलं नाही असा दावा त्यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीशी ते बोलत होते.
इतकेच नाही तर इम्रान प्रतापगढी हे कव्वाल, शायर असून शिर्डीत होणाऱ्या नव संकल्प शिबिरात त्यांचे कव्वालीचे कार्यक्रम ठेवा असा खोचक टोलाही आशिष देशमुख यांनी स्वपक्षाला दिला आहे. दरम्यान पदाचा राजीनामा देत असलो तरी पक्ष सोडणार नाही असंही स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. राज्यात राज्यसभेच्या ६ जागांसाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत काँग्रेसचा १ उमेदवार निवडून येऊ शकतो. या जागेसाठी काँग्रेसमध्ये राज्यातील अनेकजण इच्छुक होते. परंतु त्या सगळ्यांना डावलून पक्षाने बाहेरील राज्यातील उमेदवार दिला. काँग्रेसचे अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष इम्रान प्रतापगढी यांना पक्षाने उमेदवारी दिली.
अखेरच्या क्षणी बदलला महाराष्ट्रातील राज्यसभा उमेदवार
काँग्रेस एका अल्पसंख्याक नेत्याला राज्यसभेत पाठवू इच्छित होती. यात गुलाम नबी आझाद आणि इम्रान प्रतापगढी यांची नावे चर्चेत होती. आझाद यांना महाराष्ट्रातून उमेदवार बनविण्यावर सहमती झाली होती. अखेर प्रियांका गांधी यांच्या हस्तक्षेपानंतर इम्रान प्रतापगढी यांना महाराष्ट्रातून उमेदवार बनविण्यात आले. महाराष्ट्रातील नेत्यांनी प्रभारी एच. के. पाटील यांना फोन करून या निर्णयाला विरोध केला होता.
उत्तर प्रदेशातील प्रख्यात उर्दू कवी इम्रान प्रतापगढी यांना काँग्रेसमधून पाठिंब्याचे बळ अन् नाराजीची झळही सोसावी लागत असल्याचे चित्र आहे. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी इम्रान यांच्या उमेदवारीचे समर्थन केले. एका राज्यातील नेते दुसऱ्या राज्यातून राज्यसभेवर जातात यात नवीन काहीही नाही. आपले मुकुल वासनिक राजस्थानमधून उमेदवार आहेत. इम्रान प्रतापगढी हे तरुण, उत्साही आहेत, आम्ही सगळे त्यांना निश्चितपणे निवडून आणू, असे दोघांनीही ठामपणे सांगितले.