डोंबिवली: कोणत्याही अपेक्षेने किंवा मंत्रीपदाच्या अपेक्षेने आम्ही सरकारला पाठिंबा दिलेला नाही, हिंदुत्व हाच आमच्यात आणि त्यांच्यात समान धागा आहे. त्यामुळे राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रोपदी मुर्मू यांनाही आमचा पाठिंबा असल्याचे मत मनसेचे आमदार प्रमोद (राजू) पाटील यांनी व्यक्त केले.
भाजप आणि आताच्या राज्य सरकारमध्ये हिंदूत्व समान धागा आहे. भाजपच्या कोटयातून मनसेच्या एका नेत्याला विधानपरिषदेवर आमदारकी मिळत असेल तर निश्चितच आनंद आहे. विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात आमचा आवाज असेल आणि असे जर घडले तर स्वागत आहे. सध्याचे सरकार जनहिताचे निर्णय घेत आहे. पेट्रोल डिझेलचे दर कमी करण्यात आले आहेत. सरकार पुढेही जनहिताचे निर्णय घेईल, अशी आशा आहे, असे पाटील म्हणाले.
‘ती’ सदिच्छा भेट!राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन मनसे प्रमुख राज ठाकरेंची भेट घेतली. या भेटीच्यावेळी अन्य मनसे नेत्यांसह आ. पाटील देखील त्याठिकाणी होते. याबाबत पाटील यांना विचारले असता फडणवीस साहेबांनी राज साहेबांची घेतलेली भेट ही सदिच्छा भेट होती. मधल्या काळात राज ठाकरेंनीदेवेंद्र फडणवीसांना पत्र पाठवले होते. ते पत्र त्यांना आवडले होते. त्यानंतर फडणवीस सदिच्छा भेट घेण्यासाठी शिवतीर्थ निवासस्थानी आले होते. यावेळी त्यांनी राज साहेबांच्या प्रकृतीचीही विचारपूस केल्याचे पाटील यांनी सांगितले.
रखडलेल्या विकासकामांबाबत उपमुख्यमंत्र्यांशी चर्चाआमदार पाटील यांनी शुक्रवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालयात भेट घेतली. त्यावेळी त्यांनी मतदारसंघातील रखडलेल्या विकास कामांबाबत फडणवीस यांच्याबरोबर चर्चा केली. यावेळी पाटील यांच्याकडून विकास कामांचे प्रस्तावही फडणवीस यांना सादर करण्यात आले.