हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक आणि लाखोची रोजगार निर्मिती क्षमता असणारा वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याने महाराष्ट्रातील राजकारण जबरदस्त तापले आहे. यासाठी, सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांना जबाबदार धरत आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. यातच, आता भाजप नेते तथा केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी, उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला चढवत, त्यांच्या पापामुळे ही कंपनी राज्याबाहेर गेली, असे म्हटले आहे. एवढेच नाही, तर गद्दारी हा शब्द त्यांच्या रक्तात आहे, असेही राणे यांनी म्हटले आहे. ते माध्यमांशी बोलत होते.
उद्धव ठाकरे यांच्या पापामुळे कंपनी दुसरीकडे गेली - वेदांता फॉक्सकॉनवरून उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला चढवताना नारायण राणे म्हणाले, "उद्धव ठाकरेंना काही काम नाही. एक तर घर सोडत नाहीत. अडीच वर्षही मातोश्रीतच होते, आजही मातोश्रीतच आहेत. फक्त बोलायचे आहे. बाकी ते स्वतः काही करू शकले नाही आणि त्यांनी केलेल्या पापामुळे ही कंपनी दुसरीकडे गेली," असे राणे यांनी म्हटले आहे.
गद्दारी शब्द त्यांच्या रक्तात -यावेळी, शिवसेनेकडून सातत्याने वापरल्या जात असलेल्या गद्दार शब्दावरुनही राणे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. राणे म्हणाले, "गद्दार कुणाला म्हणावं, मागच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष शिवसेने एकत्र लढले, मेजॉरीटीत आले. यानंतर उद्धव ठाकरे भाजपसोबत राहिले नाहीत. त्यांनी मुख्यमंत्री होण्यासाठी हिंदुत्वाचा त्याग केला आणि गद्दारी करूनच ते मुख्यमंत्री बनले. राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत गेले. फक्त पदासाठी. त्यांनी ही गद्दारी केली आहे. यामुळे गद्दारी हा शब्द त्यांच्या रक्तात आहे."