बाळासाहेबांची काँग्रेस की नानांची काँग्रेस?; नाशिकमधील कार्यकर्त्यांची खदखद उघड

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2023 04:19 PM2023-02-06T16:19:03+5:302023-02-06T16:19:47+5:30

नाशिक पदवीधर निवडणुकीत सत्यजित तांबे यांना पक्षभेद विसरत अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी छुपी मदत केल्याचं बोललं जात आहे.

Due to Vidhan Parishad elections, 2 factions in Congress, Balasaheb Thorat and Nana Patole faced each other | बाळासाहेबांची काँग्रेस की नानांची काँग्रेस?; नाशिकमधील कार्यकर्त्यांची खदखद उघड

बाळासाहेबांची काँग्रेस की नानांची काँग्रेस?; नाशिकमधील कार्यकर्त्यांची खदखद उघड

googlenewsNext

नाशिक - विधान परिषदेच्या ५ जागांसाठी अलीकडेच निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत सर्वाधिक लक्ष नाशिक पदवीधर मतदारसंघाकडे लागले होते. ऐन निवडणुकीत काँग्रेस पक्षातील अंतर्गत राजकारणामुळे पक्षाच्या अधिकृत उमेदवाराने अर्ज न भरता अपक्ष उभे राहिलेल्या मुलाला पाठिंबा दिला. तांबे यांच्या धक्कादायक खेळीमुळे काँग्रेसनं पिता-पुत्रांवर निलंबनाची कारवाई केली. अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांच्या विजयानंतर आता कार्यकर्त्यांमधील खदखद बाहेर येऊ लागली आहे. 

काँग्रेसमधील राजकारणामुळे तांबे कुटुंबियांवर अपक्ष उभे राहण्याची वेळ आली असा आरोप आमदार सत्यजित तांबे यांनी केला होता. त्यानंतर बाळासाहेब थोरातांनीही विधान परिषद निवडणुकीत पक्षीय राजकारण झाले असा आरोप केला. त्यामुळे काँग्रेसमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. त्यात काँग्रेस प्रवक्त्या आणि नाशिकच्या माजी नगरसेविका हेमलता पाटील यांनी या प्रकारावर सूचक ट्विट केले आहे. 

हेमलता पाटील यांनी ट्विटमध्ये म्हटलंय की, आज सकाळी सकाळी फोन आला "ताई आपण बाळासाहेबांच्या कॉंग्रेसचे काम करायचे की नानांच्या कॉंग्रेसचे?"आता काय उत्तर देऊ कप्पाळ? असं सांगत नाशिकमधील काँग्रेस कार्यकर्त्यांची खदखद उघड केली आहे. नाशिक पदवीधर निवडणुकीत सत्यजित तांबे यांना पक्षभेद विसरत अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी छुपी मदत केल्याचं बोललं जात आहे. संगमनेर तालुक्यात बाळासाहेब थोरात यांची एकहाती सत्ता आहे. त्यामुळे नाशिक तसेच उत्तर महाराष्ट्रात काँग्रेसमध्ये थोरातांचे वर्चस्व आहे. मात्र विधान परिषद निवडणुकीत घडलेल्या राजकारणामुळे याठिकाणी पक्षाला गटबाजीचा फटका बसला आहे. 

काय म्हणाले बाळासाहेब थोरात?
राज्यात नुकतीच विधान परिषदेची निवडणूक झाली. त्यात खूप राजकारण झालं. या निवडणुकीत सत्यजित चांगल्या मताने विजयी झाला. त्याचं आम्ही अभिनंदन करतो. मात्र या निवडणुकीत जे राजकारण झालं ते मला व्यथित करणारं आहे. त्याबाबतच्या भावना मी पक्षश्रेष्ठींना कळवल्या आहेत, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. तसेच नाना पटोलेंसोबत काम करणं अशक्य झालंय, असंच सुरू राहिल्यास काँग्रेसमध्ये दोन गट पडतील, असा सूचक इशाराही बाळासाहेब थोरात यांनी पक्षश्रेष्ठींना लिहिलेल्या पत्रामधून दिल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. 
 

Web Title: Due to Vidhan Parishad elections, 2 factions in Congress, Balasaheb Thorat and Nana Patole faced each other

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.