- सखाराम शिंदे गेवराई (जि.बीड) : बीड जिल्ह्यात पावसाची जवळपास ३१ टक्के तूट आहे आणि तेथील शेतकरी वरुणराजाची वाट पाहून थकले आहेत. असे असले, तरी सोमवारी गोदावरी नदी दुथडी वाहिली आणि गेवराई तालुक्यातील तीर्थक्षेत्र असलेल्या पांचाळेश्वर येथील आत्मतीर्थ पूर्णपणे व राक्षसभुवन येथील शनी महाराज मंदिर अर्धे पाण्याखाली गेले. जायकवाडी धरणातून पाणी सोडल्यामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे. तुडुंब वाहत असलेल्या या नदीचे हे रूपडे पाहण्यासाठी गर्दी होत आहे.शनीच्या साडेतीन पीठापैकी एक पीठ असलेल्या राक्षसभुवन येथील शनी महाराज यांच्या मूर्ती अर्ध्या बुडाल्या आहेत.तालुक्यातील ३२ गावांतील नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी नदी पात्रात जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. महसूलचे पथक तयार असल्याचे तहसीलदार धोंडीबा गायकवाड यांनी ‘लोकमत’ला सांगितले. जायकवाडी धरणातून सोमवारी दुपारी ६,८२९ क्युसेक पाणी गोदावरी नदी पात्रात सोडण्यात आले. त्यामुळे तालुक्यातील ३२ गावांत गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे. तालुक्यातील तीर्थक्षेत्र असलेल्या पांचाळेश्वर येथील आत्मतीर्थ दत्त मंदिर पूर्णपणे पाण्याखाली गेले.
जायकवाडीच्या पाण्यामुळे राक्षसभुवनचे शनी महाराज पाण्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 6:23 AM