कर्जत : तालुक्यातील पिंपळोली गावातील शेतकरी हरिभाऊ शेकटे यांना पाण्याच्या टंचाईला कंटाळून भाजीपाला शेती अर्धवट सोडून द्यावी लागली आहे. परिणामी या शेतकऱ्याने घेतलेले कर्ज फेडण्यासाठी भाजीपाल्याचे पीक पाण्याअभावी हातून गेल्याने हा शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.नेरळ-गुडवन रस्त्यावर असलेल्या पिंपळोली गावातील अनेक शेतकरी चिल्लार नदीच्या पाण्याचा उपयोग करून उन्हाळ्यात भाजीपाला शेती करतात. उल्हास नदीला जाऊन मिळणारी चिल्लार नदी बारमाही वाहत नाही तर पावसाळा वगळता कोरडी असते. मात्र शासनाने अनेक ठिकाणी कोल्हापूर टाईपचे सिमेंट बंधारे बांधल्यामुळे त्या त्या भागात काही प्रमाणात तेथे पाण्याचा साठा उन्हाळ्यातील काही महिने असतो. त्या पाण्याचा उपयोग करून अनेक शेतकरी नदीपात्राच्या परिसरात भाजीपाला शेती करतात. पिंपळोली गावातील हरिभाऊ शेकटे यांनी पिंपळोली गावापासून काळेवाडीकडे जाणाऱ्या आपल्या जमिनीमध्ये पडवळ भाजीची शेती केली होती. चिल्लार नदीच्या पात्रातून पाणी पंप लावून ते रस्त्या पलीकडे असलेल्या आपल्या शेतात आणायचे. तेथे २० गुंठे जमिनीमध्ये वाफे पद्धतीने तारेचे कुंपण घालून पडवळ भाजीची शेती केली होती. चिल्लार नदीमधले पाणी एप्रिल महिन्यात आटले. त्यामुळे चिंतेत सापडलेल्या हरिभाऊ शेकटे यांना त्या भागातील काही शेतकरी सहकारी यांनी सहकार्य करीत दूरवर भाजीपाला शेतीसाठी पाणी उपलब्ध करून दिले. परंतु तेथून पाणी आणणे खर्चिक असल्याने आणि तेथील पाणी देखील आटून गेल्याने त्या भागातील अनेक शेतकऱ्यांनी भाजीपाला शेती अर्धवट सोडून दिली. त्यामुळे शेकटे यांच्यासारखे अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यांनी शेतीसाठी घेतलेले कर्ज देखील पाण्याच्या टंचाईमुळे फेडता आले नाही. (वार्ताहर)
पाणीटंचाईमुळे शेतकरी कर्जाच्या खाईत
By admin | Published: June 11, 2016 2:59 AM