फारुख शेख,
पाटण-जिवती तालुक्यात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. पाटण ग्रामपंचायतमध्ये येणाऱ्या मौजा जनकापूर येथील नागरिकांना चक्क एका मैलावरून उन्हातान्हातून पाणी आणावे लागत आहे. तथापि, एवढी पायपीट केल्यानंतरही पाणी मिळेलच याची शाश्वती नसल्याने ग्रामस्थ विशेषत: महिला त्रस्त झाल्या आहेत. परिणामी काही महिलांनी वैतागून माहेरची वाट धरली आहे. जिवती तालुक्यातील मौजा जनकापूर येथे नळयोजनेची एक आणि गावातील एक अशा दोन विहिरी आहेत. या दोन्ही यंदा आटल्या असल्याने गावकऱ्यांना एक मैलावरील पाटण येथून पाणी आणावे लागत आहे. एक तर, जाण्या-येण्याचा वेळ तसेच तेथे गेल्यावरही तासन्तास पाणी मिळत नाही, अशी स्थिती असल्याने महिलांची घरातील कामे खोळंबतात. त्यामुळे त्या वैतागल्या आहेत. गावातील वच्छला पवार, शोभा जाधव, अनसूया पवार या विवाहित महिलांनी आपले माहेर गाठले आहे. घागरभर पाण्यासाठी दिवसभर विहिरीवर बसूनसुद्धा पाणीमिळत नाही. नेत्यांना व अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करूनसुद्धा कोणी गावात यायला तयार नाही,अशी माहिती उपसरपंच भीमराव पवार यांनी ‘लोकमत’ला दिली.जनकापूर येथील पाण्याच्या समस्येबाबत आपण तहसीलदार यांना कळवले असून पत्रही दिले आहे. परंतु त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद आलेला नाही. - नंदा गवळी,संवर्ग विकास अधिकारी, जिवती>यवतमाळात पाणीटंचाईने महिलांचा उद्रेकच्यवतमाळ : जिल्ह्यात पाणीटंचाईने उग्ररुप धारण केले असून सततच्या विवंचनेने आता संतापाची जागा घेतली आहे. याच संतापाचा उद्रेक मंगळवारी झाला. यवतमाळ तालुक्याच्या बोथबोडन येथील महिलांनी मंगळवारी जिल्हा परिषद कार्यालयावर धडक दिली आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या (सीईओ) कक्षात घागरी फोडून आपला संताप व्यक्त केला. च्बोथबोडन येथे गत दोन महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाई आहे. गावातील सार्वजनिक विहिरी कोरड्या पडल्या आहेत. हातपंपाला पाण्याचा थेंब नाही. या गावाला अर्जुना तलावातून पाणीपुरवठा केला जातो. परंतु जलस्रोत घटल्याने जिल्हा परिषदेच्या नियंत्रणात असलेल्या या तलावावरून बोथबोडनचा पाणीपुरवठा खंडित करण्यात आला. त्यामुळे पाणीटंचाई आणखी तीव्र झाली. भर उन्हात पायपीट करून दोन किलोमीटर अंतरावरून पाणी आणावे लागते.