डमी दिला! २०१४ ला ज्याला २००० मते त्याला काँग्रेसची उमेदवारी; माजी आमदाराचा पटोलेंवर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2024 11:40 AM2024-03-29T11:40:20+5:302024-03-29T11:40:40+5:30
Nana Patole News: सुधाकर गणगणेंना पाडल्यामुळे विलासराव देशमुखांनी नाना पटोले यांना पक्षातून काढले होते. १० वर्षांनी ते परत काँग्रेसमध्ये आले - सेवक वाघाये
लोकसभा निवडणुकीसाठी अनेकजण इच्छुक आहेत. यामुळे महाआघाडी असो की महायुती दोघांनाही काही जागांवरून अद्याप निर्णय घेता आलेले नाहीत. यामुळे एकमेकांवर आरोप, प्रत्यारोप करण्याचे काम सुरुच आहे. माध्यमांत नाराजी व्यक्त करून झाल्यावर एकत्र बसून चर्चाही सुरु आहेत. अशातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवर त्यांच्याच पक्षाच्या माजी आमदाराने पैसे घेऊन डमी उमेदवार दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
भाजपचा नातेसंबंधातील उमेदवार असलेल्या भंडारा-गोंदिया मतदारसंघात नाना पटोलेंनी डमी उमेदवार दिल्याचा आरोप माजी आमदार सेवक वाघाये यांनी केला आहे. याद्वारे त्यांनी आपल्या आमदारकीची डील केल्याचाही आरोप वाघाये यांनी केला आहे.
महायुतीचे उमेदवार विद्यमान खासदार सुनील मेंढे हे पटोलेंचे नातेवाईक आहेत. त्यांना निवडून आणण्यासाठी पटोले यांनी डमी उमेदवार दिला आहे. २०१४ मध्ये शिवसेनेकडून निवडणूक लढलेल्या डॉ. प्रशांत पडोळे यांना २००० मते पडली होती. त्याला काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. त्याने कधी पंजा हातात घेतला नाही, कधी काँग्रेसचा प्रचार केला नाही की झेंडा हातात घेतला नाही. पटोले यांनी भंडारा आणि गडचिरोलीचे तिकीट विकल्याचा आरोप वाघाये यांनी केला आहे.
तसेच भंडाऱ्याच्या व्यक्तीला पटोलेंनी गडचिरोलीची उमेदवारी दिली आहे. सुधाकर गणगणेंना पाडल्यामुळे विलासराव देशमुखांनी नाना पटोले यांना पक्षातून काढले होते. १० वर्षांनी ते परत काँग्रेसमध्ये आले आणि राहुल गांधी, सोनिया गांधींना फारशी माहिती नसल्याने त्याचा फायदा ते घेत आहेत. आम्ही पक्ष उभा केला, नानांमुळे पक्ष संपायला लागला आहे, असा आरोप वाघाये यांनी केला आहे. वाघाये यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे.