नाशिक रोड : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील लिपिक व इतर पदांच्या भरतीसाठी रविवारी नाशिकच्या जैन भवनजवळील परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्याला इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर करून कॉपी करताना रंगेहाथ पकडले. त्यानंतर तो विद्यार्थी खऱ्या परीक्षार्थीच्या जागेवर डमी बसला असल्याचे उघडकीस आले आहे. न्यायालयाने त्याला गुरुवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत लिपिक व इतर पदांसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. नाशिकमध्ये परीक्षेवेळी कॉपी करणारा विद्यार्थी राहुल मोहन नागलोथ (वय २५, रा. हनुमाननगर, रामेश्वरवाडी, खोडेगाव, छत्रपती संभाजीनगर) याची अंगझडती घेतली असता, त्याच्या खिशात डिव्हाइसमध्ये फोनची दोन सीमकार्ड मिळाली. त्याचा कानात हेडफोन होता, तर परीक्षा केंद्राजवळ असलेल्या स्वच्छतागृहात त्याने मोबाइल लपविलेला होता. राहुलला त्याचा मित्र अर्जुन राजपूत (रा. टीव्ही सेंटर, सिडको, छत्रपती संभाजीनगर) हा फोनवरून उत्तरे सांगत होता.
आधारकार्ड सापडलेपर्यवेक्षकांनी राहुलच्या कागदपत्रांची तपासणी केली. त्यावेळी त्याच्याजवळ अर्जुन हरसिंग महेर (वय २५, रा. लांडकवाडी, खुडेगाव, औरंगाबाद) याचे आधारकार्ड व स्वतःचा आयडी फोटो मिळाला. कागदपत्रांच्या पडताळणीत राहुल नागलोथ हा अर्जुन महेर या परीक्षार्थीच्या नावावर डमी म्हणून परीक्षा देत असल्याचे निष्पन्न झाले.