ओरोस (जि. सिंधुदुर्ग) : डंपर चालक-मालक संघटनेचे कॉँग्रेसप्रणीत आंदोलन बुधवारी सहाव्या दिवशी सुरूच होते. लेखी मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याचा कॉँग्रेसचा पवित्रा कायम आहे. सकाळी माजी खासदार निलेश राणे यांनी संघटनेला संबोधित करताना जोपर्यंत नारायण राणे यांचा निरोप येत नाही, तोपर्यंत आंदोलन स्थळ न सोडण्याचा इशारा दिला आहे. तसेच आज, गुरुवारी आमदार नितेश राणे व इतर ३८ जणांची पोलीस कोठडी संपत आहे. त्यामुळे आजच्या पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. शिवसेना-भाजपने कोकण आयुक्तांशी झालेल्या चर्चेनंतर हे आंदोलन आपण मागे घेत आसल्याचे जाहीर केले व डंपरही घटनास्थळावरून हलविले. मात्र, कॉँग्रेसने मागण्या मान्य झाल्याचे लेखी आश्वासन देण्याचा अट्टाहास कायम ठेवला असून, बुधवारी १७० डंपर घटनास्थळी उभे करून ठेवले होते. माजी खासदार नीलेश राणे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली व त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. दरम्यान, काँग्रेसचे संदीप कुडतरकर, मधुसूदन बांदिवडेकर यांनी राजन तेली यांना चार तारखेला मारलेला दगड कालपर्यंत दिसला नव्हता का? असा प्रश्न विचारत पालकमंत्र्यांसह शिवसेना व भाजप नेत्यांनी घटनास्थळावरून पळ काढला व आंदोलकांना एकाकी सोडले असा आरोप केला. दरम्यान, काँग्रेस नेते नारायण राणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी मुंबईला रवाना झाले आहेत. त्यानंतरच या आंदोलनाबाबतची दिशा ठरणार आहे. त्यामुळे जोपर्यंत पुढील आदेश येत नाहीत, तोपर्यंत तुम्ही जागा सोडू नका, असे आवाहन माजी खासदार निलेश राणे यांनी आंदोलनकर्त्यांच्या भेटीदरम्यान केले. (वार्ताहर)
डंपर संघटनेचे आंदोलन सहाव्या दिवशीही सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2016 3:52 AM