कुडाळ (जि. सिंधुदुर्ग) : सिंधुदुर्गनगरी येथे सुरू असलेले डम्पर चालक-मालक संघटनेचे आंदोलन काँग्रेसच्या वतीने ९ मार्चपर्यंत सुरूच ठेवणार असून, या प्रश्नी न्याय न मिळाल्यास, आंदोलन जिल्हाव्यापी केले जाईल, तसेच २१ मार्चला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्ह्यातील सर्व प्रश्नांसंदर्भात काँगेसचा भव्य मोर्चा काढणार असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. मार खाऊन पळून जाणाऱ्या शिवसेना, भाजपाच्या नेत्यांची जनतेचे प्रश्न सोडविण्याची लायकी नाही. आगामी निवडणुकीत या सेना-भाजपावाल्यांना घरी पाठविल्याशिवाय राजकीय निवृत्तीचा निर्णय घेणार नाही, असेही राणे म्हणाले.राणे यांनी डम्पर चालक-मालक संघटनेच्या आंदोलनाबाबत पुढील भूमिका ठरविण्यासाठी कुडाळ येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या वेळी राणे म्हणाले की, ‘जिल्हाधिकारी आपल्या दालनात कुलूप लावून बसतात. मात्र, लोकप्रतिनिधींना भेट देत नाहीत. उलट त्यांनी पोलिसांना अमानुष लाठीमार करायला लावला. यात सर्व पक्षीय कार्यकर्ते, व्यावसायिक रक्तबंबाळ व जायबंदी झाले.’ ‘अमानुष लाठीमार करायला लावणे व जिल्हा शल्यचिकित्सकांना अपशब्द वापरणे या प्रकरणी जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्यावर विधानसभेत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील व नीतेश राणे हक्कभंग आणतील,’ असेही राणे म्हणाले. या फसव्या युती सरकारच्या घोषणा हवेतच विरल्या आहेत. २२ मार्चपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या दारू, जुगार, अनैतिक धंद्यांची पोलखोल करीत राहणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. (प्रतिनिधी)
डम्पर आंदोलन सुरूच राहणार
By admin | Published: March 08, 2016 2:56 AM