कल्याण : येथील आधारवाडी डम्पिंगला आगी लागण्याचे सत्र पाहता अखेर खडकपाडा पोलीस ठाण्यात केडीएमसी प्रशासनाकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे. ३१ मे रोजी मोठ्या प्रमाणात डम्पिंगला आग लागली होती. ती तब्बल तीन दिवस धुमसत होती. ही आग कोणीतरी लावल्याची तक्रार पोलीस ठाण्यात केली आहे. ३१ मे रोजी वाढती आग आणि धूर पाहता डम्पिंगला लागून असलेल्या साठेनगर वसाहतीतील रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले होते. यात तीन कचरावेचक किरकोळ जखमी झाले होते. वारा मोठ्या प्रमाणावर वाहत असल्यामुळे आगीचा धूर वाऱ्याच्या प्रवाहाबरोबर परिसरात गेल्याने तेथील रहिवाशांना श्वास गुदमरणे, खोकला येणे, मळमळणे आदी त्रासाला सामोरे जावे लागले होते. डम्पिंगला लागलेली आग इतकी भीषण होती की, या आगीच्या धुराचे लोट आधारवाडी परिसराबरोबरच वाडेघर, खडकपाडा, लालचौकी, शिवाजी चौक, गौरीपाडा, पौर्णिमा चौकीपर्यंत पसरले होते. आग विझवण्यासाठी महापालिकेच्या नऊ अग्निशमन बंबांनी घटनास्थळी धाव घेतली होती. ठाणे, अंबरनाथ, उल्हासनगर येथूनदेखील बंब मागवण्यात आले होते. रात्री उशिरा डम्पिंगच्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. परंतु, धुराचे लोट पुढील दोन दिवस सुरूच राहिल्याने डम्पिंगवर पाणी मारणे सुरू होते. दरम्यान, या वाढत्या घटना पाहता डम्पिंगवर मातीचा भराव टाकून आगीच्या घटनांवर नियंत्रण आणण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य अधिकारी विलास जोशी यांनी दिली होती. परंतु, पुन्हा आगी लागण्याचे सत्र सुरूच राहिल्याने प्रशासनाच्या कृतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. यामुळे आधारवाडी परिसरात राहणाऱ्या नागरिकांमध्ये संतापाची भावना जैसे थे राहिली. त्यांनी शुक्रवारी केडीएमसी मुख्यालयावर धडक देत जाब विचारला होता. (प्रतिनिधी)>पोलिसांकडे तक्रार३१ मेपासून आगीचे सत्र पाहता संशय व्यक्त करीत केडीएमसी प्रशासनाने खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यावरून, अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आधारवाडी डम्पिंगचे आरोग्य निरीक्षक नवनाथ लांडगे यांनी याप्रकरणी तक्रार केली आहे.
डम्पिंग आग; गुन्हा दाखल
By admin | Published: June 13, 2016 5:05 AM