मुंबई : ‘मुंबईतील डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न सोडवण्यात राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिका अपयशी ठरली आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत याच डम्पिंग ग्राउंडमध्ये सत्ताधाऱ्यांना गाडा,’ अशा शब्दांत विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी टीकास्त्र सोडले.मुंबईकरांच्या विविध समस्यांना वाचा फोडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने सोमवारी भायखळ्यातील राणी बाग ते आझाद मैदान धडक मोर्चा काढला. आझाद मैदानात या मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत झाले. त्या वेळी मुंडे यांनी राज्य सरकारचा खरपूस समाचार घेतला. या वेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी महापालिकेच्या सर्व विभागांचे लेखापरीक्षण करून तिथल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून दाखवावी. डम्पिंग ग्राउंडच्या प्रश्नावर मुंबईकरांनी शांत बसून चालणार नाही. कारण आता प्रश्न केवळ पैशांचा नसून सर्वांच्या आरोग्याचा आहे. मोर्चाचे नेतृत्व करणारे राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर म्हणाले की, प्रशासनाचा कारभार पाहता महापालिका मुंबईकरांना सुविधा देण्यासाठी नसून ‘मातोश्री’ला पोसण्यासाठी आहे की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्य आणि महापालिकेत शिवसेना - भाजपाची युती आहे. तरी राज्यात शिवसेना आणि पालिकेत भाजपा विरोधकांच्या भूमिकेत दिसतात. ही जनतेची फसवणूक असून, एकमेकांचे घोटाळे लपविण्यासाठी हा खटाटोप सुरू असल्याची टीका अहिर यांनी केली; शिवाय महापालिकेतील रस्ते बांधणी घोटाळ्याची आणि नालेसफाईची चौकशी निवृत्त न्यायाधीशांकडून करण्याची मागणीही त्यांनी केली.कार्यालयात घुसून जाब विचारणारमुंबईतील पुनर्विकास, गृहनिर्माण आणि झोपडपट्टी पुनर्वसन तसेच गिरणी कामगारांच्या घरांबाबत धोरण ठरविताना स्थानिकांना दूर ठेवले जाते. त्यामुळे येत्या काळात सर्वसामान्यांना विश्वासात न घेता सरकारने प्रश्न सोडविले नाही, तर संबंधित प्रशासकीय कार्यालयात घुसून सरकारी अधिकाऱ्यांना जाब विचारण्याचा इशारा अहिर यांनी दिला आहे.
‘सत्ताधाऱ्यांना डम्पिंग ग्राउंडमध्ये गाडा’
By admin | Published: April 12, 2016 3:01 AM