दापोली : तालुक्यातील जालगाव -पांगारवाडी येथील ब्रिजेश शर्मा हा १३ वर्षीय शाळकरी विद्यार्थी बेपत्ता झाल्याची घटना शनिवारी घडली. या प्रकरणी पोलीस स्थानकात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ब्रिजेश शर्मा हा शनिवारी दुपारी वडिलांच्या स्लायडींग दुकानात जातो असे सांगून गेला. मात्र, दुकानात तो गेलाच नसल्याचे कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी ब्रिजेशच्या मित्रांकडेही चौकशी केली. मात्र, संध्याकाळपर्यंत त्याचा काहीच थांगपत्ता न लागल्याने त्याची शोधाशोध खेड रेल्वेस्टेशन, चिपळूण रेल्वेस्टेशन आणि दापोली शहरात सर्वत्र करण्यात आली. शर्मा कुटुंबिय हे मूळचे उत्तरप्रदेश येथील असून, ते जालगावातच स्थायिक झाले आहे. ब्रिजेश हा सरस्वती विद्यामंदिरात सातव्या इयत्तेत शिकत होता. बेपत्ता मुलाच्या वडिलांनी तो आपल्या आजोळी उत्तरप्रदेश येथे गेल्याची शक्यता पोलिसांजवळ व्यक्त केली. या प्रकरणी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शुभांगी पवार अधिक तपास करत आहेत. (प्रतिनिधी)गृह मंत्रालयाच्या नवीन आदेशानुसार यापुढे अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्यास त्याची नोंद गुन्ह्याच्या स्वरूपात अपहरण म्हणून नोंदवण्याचे आदेश पोलीस खात्याला देण्यात आले आहेत. त्यानुसार ब्रिजेश शर्मा हा बेपत्ता झाल्यानंतर अपहरणाचा गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली.
दापोलीत विद्यार्थ्याचे अपहरण
By admin | Published: November 16, 2015 9:43 PM