ऑनलाइन लोकमत
शिरपूर (वाशिम), दि. १२ - दुर्गा विसर्जन मिरवणुकीदरम्यान गावातीलच एका मुस्लिम नागरिकाची अंत्ययात्रा आली. यावेळी दुर्गा मंडळांनी ढोल ताशे, बँन्ड, बॅन्जासह असलेले वाद्य बंद करुन अंत्ययात्रेला वाट मोकळी करुन दिल्याची घटना शिरपूर जैन येथे घडली.
ऐरवी उत्सव मिरवणुकीत शक्तीप्रदर्शनाचे प्रकार नेहमीच घडतांना दिसून येतात. परंतु शिरपूर येथील गावक-यांनी पोलीस व महसूल अधिका-यांच्या उपस्थितीत दुर्गा मंडळाकडून सामाजिक बांधीलकी जोपासण्याचे उत्तम कार्य केले. शिरपूर येथील नवदुर्गा विसर्जन मिरवणूक रिसोड फाटा ते बसस्थानक परिसरात आली असता, जय बजरंग नवयुवक मंडळ, जयभवानी नवदुर्गा मंडळ यांच्याह इतर मंडळाचे हजारो कार्यकर्ते मिरवणुकीत ढोल ताशांसह विविध वाद्यांवर नृत्य करीत होते. पाठीमागून मुस्लिम समाजातील निधन झालेल्या व्यक्तीची अंत्ययात्रा येत असल्याची माहिती मंडळांना कळताच त्यांनी सर्व वाद्य बंद करुन स्तब्ध उभे राहून अंत्ययात्रेला वाट मोकळी करुन दिली. नवदुर्गा मंडळाने केलेल्या कार्याबाबत त्यावेळी कर्तव्यावर असलेल्या पोलीस जमादार माणिक खानझोडे, महसूल मंडळ अधिकारी दिनकर केंद्रे, धनश्याम दलाल ठाणेदार हरिष गवळी, तहसीलदार रमेश जसबंत यांच्यासह उपस्थित नागरिकांनी कौतूक केले.