प्रचारकाळातच लागली होती विजयाची चाहूल : संगीता गोरंट्याल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2019 12:55 PM2019-10-30T12:55:41+5:302019-10-30T15:07:04+5:30
जालना शहरातील विकासामुळेच जनतेने काँग्रेसला प्रचंड मताधिक्य दिल्याचे सौ. गोरंट्याल यांनी सांगितले. तसेच कैलास गोरंट्याल यांचा विकास कामाचा धडाका आणि विविध योजनांचा केलेला पाठपुरावा जनतेने लक्षात ठेवल्याचे त्या म्हणाल्या.
मुंबई - 2014 मध्ये अत्यंत चुरशीची ठरलेली आणि राजकीय वर्तुळात सर्वाधिक चर्चीली गेलेली जालना विधानसभा मतदार संघातील लढत काही प्रमाणात एकतर्फी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. पारंपरिक प्रतिस्पर्धी काँग्रेसनेते कैलास गोरंट्याल आणि शिवसेनेचे अर्जुन खोतकर लढतीत चुरशीची होणार अशी शक्यता व्यक्त होत होती. परंतु गोरंट्याल यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत पुन्हा एकदा विधानसभेत प्रवेश केला. या विजयाची चाहूल आपल्याला निवडणूक प्रचारातच लागली होती, असं आमदार कैलास गोरंट्याल यांच्या पत्नी तथा जालना नगरपालिकेच्या नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी सांगितले. त्यांनी लोकमतशी संवाद साधला.
जालना विधानसभा निवडणुकीतील विजय नेहमीच ग्रामीण मतदारांवर निर्भर राहिलेला आहे. अर्जुन खोतकर यांना ग्रामीण मतदारांची मोठी साथ मिळते. तर शहरी मतदारांची पसंती गोरंट्याल यांना असते. यावेळीही ग्रामीण मतदारांमुळे गोरंट्याल यांना अडचण होणार अशी चर्चा मतदारसंघात होती. परंतु, आधीच्या सर्व निवडणुकीपैकी या निवडणुकीत ग्रामीण मतदारांनी गोरंट्याल यांच्या पारड्यात मत टाकले. त्यामुळे गोरंट्याल यांचा 25 हजारांच्या मताधिक्याने विजय झाला.
जालना शहरातील विकासामुळेच जनतेने काँग्रेसला प्रचंड मताधिक्य दिल्याचे सौ. गोरंट्याल यांनी सांगितले. तसेच कैलास गोरंट्याल यांचा विकास कामाचा धडाका आणि विविध योजनांचा केलेला पाठपुरावा जनतेने लक्षात ठेवल्याचे त्या म्हणाल्या. किंबहुना प्रचाराच्या काळात जनतेतून मिळत असलेला पाठिंबा पाहुनच विधानसभा विजयाची चाहुल लागली होती, असंही त्यांनी नमूद केले.
अक्षयला ग्रामीण प्रश्नांची जाण
परदेशात शिक्षण पूर्ण करून परतल्यानंतर अक्षय लगेच प्रचाराच्या कामात लागला. त्यालाही राजकारणाची आवड आहेच. निवडणूक प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाच्या दिवशीचं अक्षयच्या परिक्षेचा निकाल लागला. त्यात त्याने चांगलेच यश मिळवले आहे. अक्षयने कृषी क्षेत्रात शिक्षण घेतल्यामुळे त्याला ग्रामीण प्रश्न समजून घेण्यास मदत होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
कार्यालयात तिघांपैकी एकजण हजर राहतोच
जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण राजकारणात आहोत. त्यामुळे कार्यालयात भेटायला आलेल्या प्रत्येकाची भेट घेण्यासाठी कुटुंबातील एक व्यक्त कायम कार्यालयात असतोच, असं संगीता गोरंट्याल यांनी सांगितले. त्यामुळे बऱ्याचदा कुटुंबासोबत एकत्र जाणे शक्य होत नाही. पण त्यातून मार्ग काढत काम करतोय. कार्यालयात कामानिमित्त आलेल्या प्रत्येक व्यक्तीला भेटण्याचा कुटुंबाचा वारसाच असल्याचे त्या म्हणाल्या.