मुंबई : मुंबईच्या मालाड परिसरात नौदलाच्या भरतीदरम्यान शुक्रवारी सकाळी उडालेल्या गोंधळानंतर चेंगराचेंगरी होऊन चार तरुण जखमी झाले. या भरतीस अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी झाल्याने तसेच योग्य व्यवस्थापनाअभावी ही घटना घडल्याचे उमेदवारांनी सांगितले. यादरम्यान उमेदवारांवर मालवणी पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप केला जात असून, मालवणी पोलिसांनी मात्र त्याचा इन्कार केला आहे.नौदलाच्या आयएनएस हमलाच्या तळावर जवळपास १० हजार उमेदवार गुरुवारी रात्रीपासून दाखल झाले होते. नौदलाच्या स्पेशल रिक्रुटमेंट ड्राइव्ह फॉर सिनियर सेकंडरी रिक्रुट्स (एसएसआर) या पदासाठी ही भरतीप्रक्रिया सुरू होती. सकाळी साडेपाच वाजता मैदानाचे गेट उघडणार होते. मात्र ते अर्धा तास उशिरा उघडले गेले. 'फर्स्ट कम, फर्स्ट सर्व्ह', या तत्त्वानुसार होणाऱ्या या भरतीत आपला क्रमांक आधी लागावा, म्हणून गेट उघडताच हजारो उमेदवारांनी एकाच वेळी या मैदानात शिरण्याचा प्रयत्न केला. त्यातून एकच गोंधळ उडाला आणि चेंगराचेंगरी झाली. यात काहींना किरकोळ दुखापत झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात आलेल्या उमेदवारांना नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणतीही यंत्रणा नौदलाकडून उभारण्यात आली नव्हती; त्यामुळे हा गोंधळ झाला, अशी माहिती सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)>धावपळीत चार जण किरकोळ जखमी झाले. त्यांना उपचारानंतर सोडून देण्यात आले आहे. त्यामुळे लाठीचार्जच्या बातमीत काही तथ्य नाही, कारण असा प्रकार घडलेलाच नाही. - मिलिंद खेतले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मालवणी पोलीस ठाणेपोलिसांनी जे केले ते फार चुकीचे होते. या सगळ्यामुळे मी मुलाखतीला मुकलो आणि त्यात माझ्या डोळ्यालाही मार बसला, ज्यासाठी मला पुण्याला जाऊन उपचार घ्यावे लागणार आहेत.- स्वप्निल जगताप, जखमी उमेदवार
मुंबईमध्ये नौदलाच्या भरतीवेळी चेंगराचेंगरी
By admin | Published: September 10, 2016 6:07 AM