ऑनलाइन लोकमत
लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींच्या आश्वासनांना भुलून आम्ही त्यांना साथ दिली, परंतु मोदींनी आश्वासनांची पूर्तता केली नाही. देशभरातील शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. शेतकरी आत्महत्या करत असून, तीन वर्षांत आत्महत्या रोखण्याऐवजी त्यावर थापेबाजीचा उतारा दिला आहे. सरकारला सत्तेचा माज आला असल्याची टीका, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी केली असून, या सरकारचे पाय खेचल्याशिवाय शेतकरी स्वस्थ बसणार नाहीत, असा इशारा दिला आहे.
आत्मक्लेश यात्रेनिमित्त नवी मुंबईमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना शेट्टी यांनी केंद्र व राज्य सरकारवर जोरदार टीका केली. लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही यांना साथ दिली. गावा-गावांमध्ये जाऊन मते मागितली, पण आता त्याचा पश्चात्ताप होत आहे. केलेल्या चुकीचे प्रायश्चित्त घेण्यासाठी आत्मक्लेश यात्रा काढली आहे. भाजपा सरकारने तीन वर्षांमध्ये फक्त भाषणे व आश्वासने दिली. मोदी शेतकऱ्यांचे भले करतील, असे वाटले होते, परंतु त्यांच्या सरकारच्या काळात शेतकरी देशोधडीला लागत आहे. मोदींना शेतीविषयी काही कळत नाही किंवा कळत असून, जाणीवपूर्वक ते शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याची खात्री वाटू लागली आहे. यांच्या काळात शेतकऱ्यांचे कर्ज दुप्पट झाले. आत्महत्यांची संख्या वाढली असल्याची टीकाही त्यांनी केली.
भांडवलदारांना कर्जमुक्ती दिली जात आहे, पण शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यास विरोध दर्शविला जात आहे. बँकांची कर्र्जे थकविणाऱ्या उद्योजकांची नावे जाहीर केली जात नाहीत, पण वसुलीसाठी शेतकऱ्यांच्या घरांचा जाहीर लिलाव केला जात आहे. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती मिळालीच पाहिजे. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी झाली पाहिजे, या मागणीवर आम्ही ठाम आहोत. शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले नाहीत, तर सरकारचे पाय ओढल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशाराही त्यांनी या वेळी दिला आहे.