वाठार स्टेशन ( सातारा ), दि.०२ - आमीर खानच्या 'पाणी फॉऊंडेशन'ची 'वॉटर कप' स्पर्धा' आता अत्यंत चुरशीला पोहोचली असून गुरुवारी पार्श्वगायक शान यांनीही सातारा जिल्ह्यातील ग्रामस्थांसोबत मोठ्या कौतुकानं श्रमदान केलं.
कोरेगाव तालुक्यातील सर्कलवाडी गावात आमीर खान यांच्या पहिल्या पत्नी रिना दत्ता, साहित्यिक वेदप्रकाश वैदिक, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, प्रांताधिकारी अजय पवार, समन्वयक आबा लाड यांच्यासह अनेक मंडळींनी बंधा-याचे काम केले.
श्रमदान करताना उपस्थित गावक-यांना उत्साह वाटावा, यासाठी शान यांनी आपलीच काही चित्रपट गीते गाऊन साऱ्यांना मंत्रमुग्धही केले. 'लगान' या चित्रपटातील 'काले मेघाssकाले मेघाss पानी तो बरसाss' हे गीत सादर करत त्यांनी गावच्या शिवारातून थेट पावसालाच साकडं घातलं.
नवदाम्पत्यही थेट श्रमदानाला..
गेल्या एक महिन्यापासून गावोगावी सुरु असलेली मोहीम आता शेवटच्या टप्यात आली असून आबालवृद्ध मंडळही श्रमदान करण्यासाठी शिवारात उतरु लागली आहेत. गुरुवारी तर नुकतंच लग्न झालेलं नवदाम्पत्यही मुंडावळ्यांसह श्रमदानाला आलं होतं. हे पाहून उपस्थित सेलिब्रिटीही अवाक झाले.