अमित महाबळ
जळगाव : गेल्यावर्षी ऐनवेळी परीक्षा स्थगित करण्याची नामुष्की ओढावल्यानंतर राज्य सरकारने आता आरोग्य विभागाची गट क संवर्गाची भरती प्रक्रिया जिल्हा पातळीवरच राबविण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील पाच वेगवेगळ्या पदांचा यामध्ये समावेश आहे. त्याचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. त्यानुसार, शनिवारपासून ही प्रक्रिया सुरू होईल.
गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात आरोग्य विभागाच्या गट क व ड संवर्गातील पदांसाठी परीक्षा आयोजित करण्यात आली होती पण, ऐनवेळी सरकाला ही परीक्षा स्थगित करावी लागली होती. परीक्षेचे आयोजन करणारी कंपनी आणि त्यांना काम देणारे यासाठी जबाबदार असल्याचे आरोप त्यावेळी झाले होते. त्यानंतर ही भरती पुन्हा केव्हा केली जाणार, असा प्रश्न होता. या वादात उमेदवार भरडले गेले. त्यांचा वेळ वाया गेला, तसेच आर्थिक भुर्दंडही बसला. सरकार बदलताच या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. सरकारने जास्तीचा घोळ न घालता भरतीचे अधिकार जिल्हा पातळीवर वर्ग केले आहेत.
जिल्हा परिषदेला सर्वाधिकार : शासनाच्या निर्णयानुसार, जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील सर्व रिक्त पदे यापुढे सर्व जिल्हा परिषदांनी पू्र्वीप्रमाणेच जिल्हा निवड मंडळामार्फत जिल्हा परिषद स्तरावर भरायची आहेत. या निर्णयान्वये जि.प.मधील आरोग्य विभागाशी संबंधित आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता, आरोग्य पर्यवेक्षक या पाच संवर्गातील पदे भरली जाणार आहेत. त्याचे वेळापत्रक जाहीर झाले आहे.
भरती प्रक्रियेचे वेळापत्रक१) बिंदू नामावली अंतिम करणे - २७ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर२) विभागीय स्तरावरुन कंपनीची निवड करणे - १६ सप्टेंबर अखेर३) निवड झालेल्या कंपनीने डेटा हस्तांतरित करून घेणे - १७ ते २२ सप्टेंबर४) निवड झालेल्या कंपनीने संवर्गनिहाय पात्र उमेदवारांची संख्या जिल्हा निवड समितीला कळवणे - २३ ते २७ सप्टेंबर५) जिल्हा निवड समितीने प्रत्यक्ष परीक्षेच्या आयोजनासाठी कार्यवाही करणे - २८ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर६) पात्र उमेदवारांना प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध करून देणे - ५ ते १० ऑक्टोबर७) परीक्षेचे आयोजन - १५ व १६ ऑक्टोबर८) अंतिम निकाल, नियुक्ती आदेश - १७ ते ३१ ऑक्टोबर