मुंबई - मध्यरेल्वेच्या कसारा मार्गावरील विस्कळीत झालेली वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत आहे. इंजिनमध्ये बिघाड झाल्याने बंद पडलेली पंजाब मेल मुंबईच्या दिशेने रवाना झाली आहे. त्यामुळे कसारा-आसनगाव वाहतूक सुरु झाली आहे. सकाळी सातच्या सुमारास कसारा-उंबरमाळी रेल्वे स्थानकादरम्यान पंजाब मेलचे इंजिन बंद पडल्याने मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक जवळपास तास-दीडतास ठप्प होती. सकाळची लोकल पकडून मुंबईच्या दिशेने येणा-या लाखो नोकरदारांचे हाल झाले. कसऱ्याच्या दिशेने डाऊनमार्गे जाणारी रेल्वे वाहतूक मात्र सुरु होती.
कसारा ते आसनगाव मार्गावरील खर्डी, तानशेत, उंबरमाली, अटगाव आदी स्थानकात प्रवासी ताटकळले होते. तासभरानंतरही वाहतूक पूर्वपदावर आली नव्हती. पंजाब मेलच्या मागे दोन लोकल व एक एलटीटी सुलतानपूर एक्सप्रेस उभी होती.
दोन महिन्यापूर्वी 29 ऑगस्टला आसनगाव आणि वाशिंद दरम्यात वेहरोळी वस्ती जवळ नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसचे 9 डबे घसरुन अपघात झाल्यामुळे कसारा मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. जवळपास तीन दिवस कल्याण-कसारा मार्गावरील वाहतूक ठप्प होती. प्रसंगावधान दाखवून चालकान वेळीच ब्रेक लावल्याने मोठी दुर्घटना टळली होती.
29 ऑगस्टला मुसळधार पावसामुळे संपूर्ण मुंबईला ब्रेक लागला होता. त्याचवेळी ही दुर्घटना घडली होती. त्याचवेळी तुफान पावसामुळे अनेक लोकल्स बिघडल्या होत्या.