मुंबई : दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळण्याबाबत महापालिकेकडे केलेला अर्ज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने अधिकृतरीत्या मागे घेतला आहे. तसे रीतसर पत्र आमदार सदा सरवणकर यांनी जी-उत्तर विभागाच्या सहायक आयुक्तांना दिले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार हिंदू सणांमध्ये एकमेकांमधील वाद टाळावा व हे सण हिंदू धर्मीयांना तसेच महाराष्ट्र प्रेमींना आनंदाने साजरे करता यावेत यासाठी अर्ज मागे घेत आहोत, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. अर्ज मागे घेतल्याने एकप्रकारे महापालिकेची डोकेदुखी संपली आहे.
शिंदे गटाचा मेळावा कुठे होणार?दसरा मेळाव्यासाठी आझाद मैदान किंवा क्रॉस मैदान मिळण्यासाठी अर्ज केला आहे, अशी माहिती शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी दिली.
महापालिकेवरील दडपण दूर- शिंदे यांच्या गटाने १ आणि ७ ऑगस्ट रोजी दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळण्याबाबत पालिकेकडे अर्ज केला होता. - यंदाच्या दसरा मेळाव्यासाठी शिंदे आणि ठाकरे यांच्या शिवसेनेने पालिकेकडे अर्ज केला होता. त्यामुळे मागील वर्षीप्रमाणे याही वर्षी शिवाजी पार्क मैदानावरून दोन्ही गटांत संघर्ष पेटला होता आणि नेहमीप्रमाणे पालिकेची अडचण झाली होती.
- पालिकेने कोणत्याच अर्जावर निर्णय घेतला नव्हता. सोमवारी ठाकरे गटाचे अनिल परब यांनी सहायक आयुक्तांची भेट घेऊन परवानगीचे काय झाले, अशी विचारणा केली होती. शिंदे गटाने शिवाजी पार्कऐवजी दुसऱ्या मैदानासाठी अर्ज केल्याचे वृत्त ‘लोकमत’ने मंगळवारी दिले होते.