मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाशी संबंधित अनेक प्रकरणे सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठापुढे असतानाच आता शिवाजी पार्कवरील दसरा मेळावादेखील कोर्टात जाण्याची शक्यता आहे. कारण मेळाव्यास मुंबई महापालिकेने परवानगी नाकारली तर उच्च न्यायालयात दाद मागण्याची तयारी उद्धव ठाकरे गटाने केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने याच ठिकाणी मेळावा घेण्याची भूमिका घेतल्याने मेळावा नेमका कोणाचा होणार, ही अनिश्चितता कायम आहे.
शिवसेनेचे नेते आणि उद्धव ठाकरे यांचे विश्वासू अनिल परब यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, मुंबई महापालिका आम्हालाच परवानगी देईल, असा आमचा विश्वास आहे. परवानगी नाकारण्याचे कोणतेही कारण दिसत नाही. मागे शिवाजी पार्कला सायलेन्स झोन म्हणून जाहीर केल्यानंतर शिवसेनेचा मेळावा होणार की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. तथापि, हा केवळ मेळावा नाही तर पारंपरिक उत्सव असल्याचे मत देत उच्च न्यायालयाने मेळाव्याला परवानगी दिली होती. याची आठवण परब यांनी करून दिली. महापालिकेने परवानगी नाकारली तर न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याचा पर्याय आमच्यासमोर असेल.
शिंदे गटाने शिवाजी पार्कवर मेळावा आपणच घेणार, अशी भूमिका घेत तयारी चालविली आहे. या संदर्भात मुख्यमंत्री शिंदे यांनी पक्षाचे काही आमदार आणि पदाधिकाऱ्यांशी शनिवारी चर्चा केल्याचे सूत्रांनी सांगितले. ‘मेळावा आपणच घेणार का,’ असा प्रश्न शिंदे यांना पत्रकारांनी ठाण्यात विचारला असता ते म्हणाले की, अजून वेळ आहे. आता गणेशोत्सव, मग नवरात्र आहे, नंतर बघू.
परवानगी ठाकरे गटाला द्यायची, की शिंदे गटाला यावरून महापालिका संभ्रमात आहे. महापालिकेत सध्या प्रशासक राजवट आहे. त्यामुळे एकप्रकारे राज्य सरकारचेच नियंत्रण आहे. त्यामुळे शिंदे गटाला परवानगी दिली जाईल, असे म्हटले जात आहे. लगेच निर्णय घेण्याऐवजी ठाकरे गटाला दबावात ठेवण्याची शिंदे गटाकडून खेळली जात असल्याचे समजते. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना शिवाजी पार्कवर ठाकरे यांचाच मेळावा व्हायला हवा, असे सांगितले. दोघांनाही मेळावा घेण्याचा अधिकार आहे. परवानगी देण्याचा अधिकार महापालिकेला आहे. ज्यांच्याकडे सत्ता आहे ते निर्णय घेत असतात, असेही ते म्हणाले.
शरद पवारांचा शिंदेंना सल्लाराष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी, ‘वाद न घालता मुख्यमंत्र्यांनी सामोपचाराने हा प्रश्न सोडवावा’, असा सल्ला एकनाथ शिंदे यांना दिला आहे. सभा, मेळावे घेण्याचा अधिकार प्रत्येकच राजकीय पक्षाला आहे त्यामुळे सर्वसमावेशक भूमिका घ्यावी, अशी प्रतिक्रिया पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली.