मुंबई - कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे. हायकोर्टानं दिलेल्या निर्देशाचं पालन होईल यासाठी पोलीस तत्पर असतील. अडीच ते ३ लाखापेक्षा जास्त लोक बीकेसीत दसरा मेळाव्याला येतील. खऱ्या अर्थाने हिंदुत्वाचा, बाळासाहेबांचा जो विचार होतो त्याचं संबोधन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करतील. असंख्य नागरिक एकनाथ शिंदे यांचे स्वागत करण्यासाठी जमतील असा विश्वास मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.
दीपक केसरकर म्हणाले की, दसरा मेळाव्याला कोल्हापूरात महालक्ष्मीची पालखी निघते, जुन्या राजवाड्यातून शाही घराण्याची मिरवणूक निघून दसरा साजरा केला जातो. कोल्हापूरच्या दसरा प्रथेला राज्याचा दर्जा घेऊन शाही घराण्यासोबत मिळून राज्य सरकार साजरा करेल. संपूर्ण भारतासमोर आणि जगात हा मेळावा साजरा होईल यासाठी प्रयत्न आहे. छत्रपती शिवरायांनी सुरू केलेली परंपरा कायम राहील असंही त्यांनी सांगितले.
तसेच दसरा मेळाव्यात कुठलाही अनुसुचित प्रकार घडणार नाही याबाबत पोलीस काळजी घेतील. सर्वांनी लवकर सभास्थानी पोहचणं गरजेचे आहे. पार्किंगला वाहनं लावून ५-१० मिनिटे चालत सभास्थानी पोहचता येणार आहे. बीकेसीतील मेळावा अतिविराट होईल. बाळासाहेबांच्या विचारांचं सोनं सभेत लुटलं जाईल. राज्यातील जनता आशेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे बघतेय. एकनाथ शिंदेंचे विचार ऐकण्यासाठी लोकं जमतील असं दीपक केसरकर म्हणाले.
दसरा मेळाव्यात विचार नाही तर...दसरा मेळाव्यात आता पहिल्यांदा कुणाकडे डोकी जास्त आहेत त्यावरून खरी सेना कुणाची हे ठरणार. यंदाच्या दसरा मेळाव्यात विचार ऐकायला मिळणार नाही. एकमेकांचे वस्त्रहरण करणार आहेत. सोनं लुटण्याऐवजी अंगावरच्या चिंध्या गोळा कराव्या लागतील. मेळावे यशस्वी होण्याऐवजी यामागे असणारी जी शक्ती आहे त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. शिवतीर्थावरील मेळावा यशस्वी झाला नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिष्ठा जाणार आहे. यशस्वी झाला तर राहिलेल्या शिवसैनिकांचे मनोध्यैर्य वाढणार आहे त्याचसोबत बीकेसीतील मेळावा यशस्वी झाला नाही तर भाजपाची प्रतिष्ठा पणाला लागेल. त्यामुळे मेळावे यशस्वी करण्याची गरज संयोजक, आयोजकांपेक्षा इतरांना जास्त आहे अशा शब्दात मनसेने शिंदे-ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यावर टीकास्त्र सोडलं आहे.