पुणे : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी येत्या २१ फेबु्रवारी रोजी मतदान होत आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत दि. १३ फेब्रुवारी आहे. त्यामुळे त्यानंतरच जिल्ह्यातील लढतीचे चित्र स्पष्ट होणार असल्याने उमेदवारांना प्रत्यक्ष प्रचारासाठी अवघे सहाच दिवस मिळणार आहेत. अवघ्या सहा दिवसांत मतदार संघातील १०-१५ गावांमध्ये पोहचण्याचे मोठे आव्हान उमेदवारांसमोर उभे ठाकलेले आहे. अपक्ष उमेदवारांना तर आपले चिन्ह पोहचवताना खूपच कसरत करावी लागणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने यावेळी प्रथमच महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याचा निर्णय घेतला. परंतु महापालिकांसाठी आयोगाने उमेदवारी अर्ज स्विकारणे, छाननी व आणि माघारी यामध्ये आठ दिवसांचे अंतर ठेवले आहे. महापालिकांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत ७ फेबु्रवारी होती. यामुळे महापालिकांमधील लढतीचे चित्र ७ तारखेलाच स्पष्ट झाले असून, अपक्ष उमेदवारांना चिन्हाचे वाटप देखील करण्यात आले. त्यातून शहरी भागातील मतदार संघ तुलनेत लहान आहेत. उमेदवारांना आपले चिन्ह पोहचविण्यासाठी अनेक सुविधा उपलब्ध आहेत. या उलट जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी १ ते ६ फेबु्रवारी ही मदुत असून, छाननी ७ फेबु्रवारीला करण्यात आली. आता माघारीसाठी १३ फेबु्रवारीपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. माघारीनंतर सायंकाळी ४ नंतर अपक्ष उमेदवारांना चिन्हाचे वाटप करण्यात येणार आहे. आयोगाच्या सूचनेनुसार महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांचा प्रचार रविवार (दि.१९) रोजी सायंकाळी ५ वाजता बंद करण्यात येणार आहे. अशा परिस्थितीत उमेदवारांना सर्व मतदारांपर्यंत पोहोचताना त्यांची दमछाक होणार आहे. अवघ्या सहा दिवसांच्या प्रचारात आता कोण बाजी मारतात हेच पाहायचे.
अवघ्या ६ दिवसांत उडणार धुरळा
By admin | Published: February 09, 2017 3:20 AM