नागपूर : येथील आमदार निवासात तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या प्रकरणाने राज्यभर खळबळ उडवून दिली आहे. या प्रकरणाचे पुरावे गोळा करण्यासाठी शुक्रवार सकाळपासून पोलीस यंत्रणा कामी लागली असून, राज्य महिला आयोगातर्फेही या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी सुरू झाली आहे. गिट्टीखदान पोलिसांनी आमदार निवासातून सीसीटीव्हीचा डीव्हीआर (डिजीटल व्हीडीओ रेकॉर्डर) जप्त केला. त्यातून १४ एप्रिलपासून तीन दिवसांचे सर्व चित्रण पोलिसांनी तपासले. त्याआधारे एक अहवाल तयार करण्यात आला. तसेच आमदार निवासात त्या दिवशी ड्युटीवर असलेल्या कर्मचाऱ्यांचेही पोलिसांनी जबाब नोंदविले.त्यानुसार, आरोपी मनोज भगतने आमदार निवासाचे कक्षसेवक योगेश भुसारी यांच्या शिफारशीवरून रजत मद्रे आणि प्रेम शुक्ल या दोघांसाठी ३२० क्रमांकाची खोली मिळवून घेतली. केवळ एक दिवस हे पाहुणे थांबतील, असे सांगण्यात आले होते. त्यानुसार, कक्षसेवक रामकृष्ण राऊत यांनी ती खोली आरोपींना उपलब्ध करून दिली. नियमानुसार त्यांच्याकडून एक हजार रुपये भाडेही घेण्यात आले. एक दिवसाच्या नावाखाली तब्बल तीन दिवस तीन रात्री आरोपींनी या रूमचा वापर केला.१७ एप्रिलला सकाळी त्यांनी खोलीतून मुक्काम सोडला. त्यानंतर या तिघांमध्ये वाद झाला. सर्व आपापल्या घरी पोहचले. या तरुणीच्या मागोमाग सकाळी ११ वाजता मनोज भगत तिच्या घरी पोहचला. तुमची मुलगी गेले चार दिवस दुकानात आली नाही. ती माझ्यासोबतही नव्हती, असे पालकांना सांगितले. यावेळी तो दारूच्या नशेत तर्र होता. तूच तिला बाहेरगावी घेऊन गेला. तू बाहेरगावी पोहचल्याचे सांगून फोनही केला अन् आता ती माझ्यासोबत नव्हती, असे कसे म्हणतो, असे म्हणत युवतीच्या पालकांनी त्याला हाकलून लावले.आपल्याला पालक मारहाण करतील, या भीतीने युवतीने घर सोडून सरळ रेल्वेस्थानक गाठले. तर, ती बेपत्ता झाल्याने पालकांनी गिट्टीखदान ठाण्यात तक्रार नोंदवली. (प्रतिनिधी)आमदार निवासातील प्रकाराची चौकशीनागपूर येथील आमदार निवासांचा उपयोग फक्त हिवाळी अधिवेशन काळात केला जातो. एरवी ती निवासस्थाने वापरात नसतात. या निवासस्थानांमधील गैरप्रकार समोर आला आहे. या प्रकरणी नागपूर पोलीस सखोल चौकशी करीत असल्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जळगाव येथे सांगितले.
आमदार निवासाचा डीव्हीआर जप्त
By admin | Published: April 22, 2017 1:19 AM