ऑनलाइन लोकमत
डिगोळ/ औसा (लातूर), दि. 28 - कपडे धुण्यासाठी आई-वडिलांसोबत गेलेल्या एका १६ वर्षीय मुलाचा पोहताना शेतततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना डिगोळ (ता. शिरुर, अनंतपाळ) येथे घडली, तर बुधोडा (ता. औसा) शिवारात पाणी आणण्यासाठी गेलेल्या एका १७ वर्षीय युवकाचा विहिरीत बुडून मृत्यू झाला़ या दोन्ही घटना बुधवारी सकाळी घडल्या़डिगोळ (ता़ शिरुर अनंतपाळ) येथील अंबादास सुरवसे, त्यांची पत्नी अंजनाबाई आणि अभिजीत व अविनाश ही दोन मुले, असे चौघेजण बुधवारी सकाळी कपडे धुण्यासाठी स्वत:च्या शेताकडे गेले होते़ दरम्यान, शेताशेजारील नागनाथ कोटे यांच्या शेततळ्यावर अंजनाबाई सुरवसे ह्या कपडे धुवत होत्या़ तेव्हा अभिजीत व अविनाश ही दोन्ही भावंडे पोहण्यासाठी शेततळ्यात उतरली़ ही दोन्ही मुले पाण्यात बुडत असल्याचे पाहून अंजनाबार्इंनी आरडाओरड केली़ त्यामुळे शेतातील सालगड्याने शेततळ्याकडे धाव घेऊन अविनाशला पाण्याबाहेर काढले, तर अभिजीत सापडला नाही़ दरम्यान, गावातील नागरिकांच्या मदतीने अभिजीत सुरवसे (१६) यास पाण्याबाहेर काढण्यात आले़ परंतु, तो मृत झाला होता़ अभिजीत हा कबनसांगवी येथील महात्मा फुले विद्यालयात इयत्ता नववीच्या वर्गात शिकत होता़ याप्रकरणी बाबुराव बोरोळे यांच्या माहितीवरुन शिरुर अनंतपाळ पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़दुसरी घटना औसा- लातूर रस्त्यावरील कारंजी खडी केंद्रानजीकच्या बुधोडा शिवारात घडली आहे़ गौतम अस्तिक कांबळे (१७, रा़ काळमाथा) हा धनराज कारंजे यांच्या शेतात कामास होता़ बुधवारी सकाळी गौतम हा शेतातील विहिरीचे पाणी आणण्यासाठी गेला होता़ दरम्यान, तो पाण्यात पडल्याने बुडून मृत्यू झाला़ याप्रकरणी धनराज कारंजे यांच्या फिर्यादीवरुन औसा पोलिसांत आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़