- नारायण जाधवठाणे : कोकण रेल्वेवरील बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित चिपळूण-कराड रेल्वेमार्ग खासगीकरणातून परवडणारा नसल्याचे व्यवहार्यता अहवालातून सिद्ध झाल्याने त्या स्पर्धेतून शापूरजी पालनजी कंपनीने माघार घेतली आहे. यामुळे आता हा प्रकल्प कोकण रेल्वे आणि महाराष्ट्र शासन संयुक्त भागीदारीतून करणार असल्याची माहिती कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांनी दिली. कोकण रेल्वेच्या विविध प्रकल्पांची पाहणी केल्यानंतर ते खास लोकमतशी बोलत होते. या प्रकल्पाचा निम्मा खर्च उचलण्याची तयारी महाराष्ट्र शासनाने दर्शवली आहे. तसेच जयगड ते दिग्नी हा दुसरा एका मार्ग पूर्णत: जिंदाल स्टील ही खासगी कंपनी चालवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या वेळी कारवार विभागाचे महाव्यवस्थापक मोहम्मद असीफ खान, मुख्य जनसंपर्क अधिकारी एल.के. वर्मा, वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी गिरीश करंदीकर उपस्थित होते.कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला गोवा, दक्षिण भारताशी रेल्वेमार्गाने जोडण्याच्या दृष्टीने चिपळूण ते कराड हा मार्ग अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे. याद्वारे तिन्ही प्रदेशांतील औद्योगिक विकासाला गती मिळणार आहे. मालवाहतूक लवकर आणि स्वस्तात करणे शक्य होणार आहे.कोकण रेल्वेमार्गावरील १०४ किमीचा मार्ग खासगीकरणातून पीपीपी तत्त्वावर बांधण्याचा करारनामा मनमोहन सिंग सरकारच्या काळात झाला होता. यात ७४ टक्के हिस्सा खासगी कंपनीचा अर्थात शापूरजी पालनजी यांचा आणि २६ टक्के हिस्सा कोकण रेल्वेचा राहील, असे ठरले होते. यावर शापूरजी पालनजी कंपनी ३२०० कोटी खर्चून हा रेल्वेमार्ग बांधणार होती. यातून पश्चिम महाराष्ट्राला कोकणातील जयगड, आंगरे, विजयदुर्ग, दिग्नी, रेवस, दिघी या बंदरांना जोडणे शक्य होणार होते. परंतु, फिजिबिलिटी अर्थात प्रकल्प व्यवहार्यता अहवालातून पुढे आलेल्या बाबींमुळे शापूरजी पालनजी कंपनीने तो करण्यास नकार देऊन यातून माघार घेतली आहे.पीपीपीतून हा प्रकल्प शक्य नसल्याचे समोर आल्यावर ही बाब कोकण रेल्वेने महाराष्ट्र शासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर हा प्रकल्प महाराष्ट्र शासन आणि कोकण रेल्वे ५०-५० भागीदारीतून करणार आहे. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र शासन ४५० कोटींची मदत देणार असल्याचे गुप्ता यांनी सांगितले.कोकण रेल्वेवरील महत्त्वाकांक्षी प्रकल्पकोकण रेल्वेवरील आणखी एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे ७७१ कोटींचा दिग्नी ते जयगड मार्ग होय. २३ किमीचा मार्ग जिंदाल स्टील, कोकण रेल्वे आणि महाराष्ट्र मेरीटाइम बोर्ड यांच्या संयुक्त भागीदारीतून बांधण्यात येत आहे. यासाठी जयगड-दिग्नी रेल लिमिटेड ही कंपनी स्थापन करण्यात आली आहे. यात सर्वात मोठा वाटा जिंदाल कंपनीचा असल्याने तो पूर्णत: तेच चालवणार आहेत. यातून जयगड पोर्टला रत्नागिरीनजीकच्या दिग्नी या रेल्वे स्थानकाशी जोडून बंदरात येणाºया किंवा बंदरातून जाणाºया मालवाहतुकीची ने-आण करणे शक्य होणार आहे. वार्षिक १२ दशलक्ष मेट्रिक टन मालवाहतुकीची ने-आण करता येणार आहे.या दोन मार्गांसह गोव्यातील बाळ्ळी लॉजिस्टिक पार्कमुळे कोकण रेल्वेद्वारे दक्षिण भारतासह गोवा आणि महाराष्ट्रातील बहुतेक बंदरे एकमेकांशी जोडली जाणार असल्याने नजीकच्या भविष्यात मालवाहतुकीवरील खर्चात मोठी बचत होणार असून रस्ते वाहतुकीवरील ताण कमी होऊन संभाव्य अपघातांना आळा बसणार आहे.
दिग्नी-जयगडमार्ग जिंदाल कंपनीच चालविणार, शापूरजी पालनजी कंपनीची माघार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 5:40 AM