नागपूर-मुंबई दुरंतो एक्स्प्रेस : अकोला रेल्वेस्थानकावर टळला अनर्थअकोला: सिग्नल नसल्यामुळे रेल्वेस्थानकाच्या फलाट क्रमांक १ वर थांबलेल्या गाडी क्र. १२२९० नागपूर-मुंबई दुरंतो एक्स्प्रेसच्या एस-२ या आरक्षित डब्याखालील डायनामाने अचानक पेट घेतला. शनिवार, २२ जुलै रोजी रात्री १0.२९ वाजता ही घटना घडली. यावेळी फलाटावर उभ्या असलेल्या काही जणांच्या ही बाब लक्षात येताच तत्काळ आगरोधक उपकरणांनी पेटलेला डायनामा विझविण्यात आला. नागपूर-मुंबई दुरंतो एक्स्प्रेसला अकोला रेल्वेस्थानकावर थांबा नाही; मात्र सिग्नल नसल्यामुळे या गाडीला ११ वाजून २९ मिनिटांनी फलाट क्रमांक १ वर थांबविण्यात आले. गाडी थांबताच अचानक एस-२ या आरक्षित डब्याखालील हॉट एक्सलजवळील विद्युत निर्माण करणाऱ्या डायनामाने पेट घेतला. फलाटावर उभ्या असलेल्या काही जणांनी ही बाब रेल्वे अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली. तत्काळ आगरोधक उपकरणांनी पेटलेला डायनामा विझविण्यात आला. माहिती मिळताच रेल्वे स्थानक प्रबंधक एम. के. पिल्ले, रेल्वे अधिकारी गुमास्ते, जीआरपी पोलीस तत्काळ घटना स्थाळी पोहोचले होते. रात्री ११.५४ वाजता दुरंतो एक्स्प्रेस भुसावळकडे रवाना झाली. या घटनेमुळे मागाहून येणारी पुरी-शिर्डी आणि हावडा-अहमदाबाद या दोन्ही एक्स्प्रेस गाड्या आपल्या निर्धारित वेळेपेक्षा उशिराने अकोला रेल्वेस्थानकावर पोहोचल्या. (प्रतिनिधी)
दुरंतोच्या आरक्षित डब्याखालील डायनामाने घेतला पेट
By admin | Published: July 24, 2016 1:44 AM