वाशिम : पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थी शेतकऱ्यांना ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. सोमवार (दि.५) रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार, राज्यातील अद्यापही ३३ लाख ४१ हजार ८२६ शेतकऱ्यांनी ई-केवायसी केले नाही. येत्या दोन दिवसांत उर्वरित शेतकऱ्यांची ई-केवायसी करण्याचे आव्हान यंत्रणेसमोर आहे.
योजनेमध्ये सहभागी शेतकऱ्यांना दरवर्षी तीन टप्प्यांत सहा हजाराचे अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केले जाते. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. दरम्यान, या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले. त्यासाठी सुरूवातीला ३१ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यानंतर चार वेळेस मुदत वाढविण्यात आली. योजनेत सहभागी शेतकऱ्यांना ७ सप्टेंबरपर्यंत ई-केवायसी करता येणार आहे. केवायसी करण्यासाठी शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे.
राज्यात १ कोटी ६८ लाख ४८ शेतकरी योजनेत सहभागी आहेत. ६८.७१ टक्के शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली असून ३१.२९ टक्के शेतकऱ्यांची शिल्लक आहे. ई-केवायसी मोहीमेत भंडारा जिल्हा राज्यात अव्वल असून या जिल्ह्यातील १८.२१ टक्के शेतकऱ्यांची केवायसी शिल्लक आहे. नाशिक जिल्ह्यातील १८.७८ तर वाशिम जिल्ह्यातील १९.२५ टक्के लाभार्थींची केवायसी शिल्लक आहे. हे जिल्हे अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी आहेत. तर ठाणे, पालघर आणि रत्नागिरी या तीन जिल्ह्यातील ५० टक्के पेक्षा अधिक शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण करणे शिल्लक आहे. शिल्लक शेतकऱ्यांच्या टक्केवारीनुसार गुणानुक्रम ठरविण्यात आला आहे.
७३ लाख शेतकऱ्यांची केवायसी पूर्णकिसान सन्मान योजनेसाठी पात्र असलेल्या १ कोटी ६८ लाख ४८ शेतकऱ्यांपैकी ७३ लाख ३८ हजार २२२ शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केली आहे. ही आकडेवारी ५ सप्टेंबर रोजी सकाळी प्राप्त अहवालानूसार आहे. यामध्ये उर्वरित दोन दिवसांत आणखी शेतकरी वाढणार आहे. मात्र शिल्लक असलेल्या ३३ लाख शेतकऱ्यांची ई-केवायसी करणे अशक्य आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मुदतवाढ देण्याचा विचार शासनाला करावा लागणार नसता लाखो शेतकरी किसान योजनेच्या हप्त्यापासून वंचित राहू शकतात.