मुंबई : शिक्षणाची नवनवीन द्वारे उघडत असताना ईशान्य भारतातील विद्यार्थ्यांनी मागे पडू नये. ईशान्य भारतातील भाषांना व्यासपीठ देण्याचे कार्य मुंबई विद्यापाठाने सुरु केले असून त्याकरिता देखील विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे मत मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय देशमुख यांनी व्यक्त केले.विद्यापीठाच्या मराठी भाषा भवनात माय होम इंडियाच्या वतीने आयोजित नॉर्थ ईस्ट स्टुडंट फेस्टीव्हलचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी कुलगुरु बोलत होते. ईशान्य भारतातील विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण प्रदान करुन आपल्या भविष्याचे वेध घ्यावेत त्यांना हवे ते सहकार्य विद्यापीठ करेल, असेही देशमुख यांनी नमूद केले. याप्रसंगी, संस्थेचे संस्थापक सुनिल देवधर, संस्थेचे ईशान्य भारत प्रकल्प प्रभारी विनय पांडे व अॅडव्होकेट प्रकाश साळसिंगीकर आदी उपस्थित होते. यावेळी वांद्रे झोनचे पोलीस उपायुक्त विरेंद्र मिश्रा यांचा सन्मान करण्यात आला. मणिपूरचे अबुंग्चा मायग्राम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.भारतमातेच्या पुत्रांनी कोणताही प्रादेशिक वा भाषिक भेदभाव न करता केवळ भारतीय म्हणून राहावे. भारतात रेसीझम नव्हे तर फेसीझममुळे समस्या निर्माण होतात. उर्वरित भारतातील लोकांच्या अज्ञानामुळे पूर्वांचलातील विद्यार्थ्यांना फेसीझमला तोंड द्यावे लागते. मात्र ‘माय होम इंडिया’ या सर्व विद्यार्थ्यांसोबत सदैव राहिल, असे आश्वासन सुनिल देवधर यांनी दिले.कार्यक्रमात ईशान्य भारतातील मुंबईत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपली संस्कृती नृत्य व गाण्यांच्या माध्यमातून सादर केली. (प्रतिनिधी)
ई. भारतातील विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्या
By admin | Published: August 29, 2016 6:22 AM