लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : सिडको प्रकल्पग्रस्त स्थानिक ठेकेदार सिडकोमार्फत करीत असलेली एटूची कामे सिडको नोड पालिकेकडे हस्तांतरित झाल्यानंतर बंद करून सर्व कामे ई - निविदा पद्धतीने सुरू करण्याचे संकेत पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी खारघर येथे झालेल्या बैठकीत दिले. एटूची कामे व्यवस्थितरीत्या केली जात नसल्याचा ठपका शिंदे यांनी ठेवला आहे. त्यामुळे सिडको नोड पनवेल महानगरपालिकेकडे हस्तांतरानंतर एटूची कामे पूर्णपणे बंद होण्याची शक्यता आहे.आयुक्त डॉ.सुधाकर शिंदेंच्या या निर्णयाला प्रकल्पग्रस्तांकडून जोरदार विरोध होण्याची शक्यता आहे. सिडकोने नवी मुंबई परिसरातील जमिनी संपादित करताना प्रकल्पग्रस्तांना अनेक आश्वासने दिली होती. त्यामध्ये प्रत्येक घरात नोकरी हे महत्त्वाचे आश्वासन होते. मात्र कालांतराने सिडकोची सर्वच आश्वासने हवेत विरल्यानंतर अनेक बेरोजगार प्रकल्पग्रस्तांनी ठेकेदार म्हणून आपली घरे चालविण्याचे ठरविले त्यानुसार सिडकोने एटू कामांच्या माध्यमातून प्रकल्पग्रस्त ठेकेदारांना विविध कामे देण्यास सुरुवात केली. यामध्ये नालेसफाई, मैदाने सुशोभीकरण, गवत कापणे, जनरेटर पुरविणे, जेसीबी पुरविणे यासारख्या असंख्य कामांचा या एटूच्या कामात समावेश आहे. सिडकोच्या माध्यमातून देखील अनेक वेळा एटूची कामे बंद करण्यासंदर्भात हालचाली सुरू झाल्यानंतर स्थानिक बेरोजगार प्रकल्पग्रस्त ठेकेदारांनी याकरिता आंदोलन केले, त्यामुळे सिडकोने ही कामे सुरूच ठेवली. पनवेल महानगरपालिकेची स्थापना झाली असून नव्याने लोकप्रतिनिधी पालिकेवर निवडून गेले आहेत. खारघर, कळंबोली, कामोठे, नवीन पनवेल, तळोजा यासारख्या सिडकोने स्थापन केलेल्या नोडचे सर्व अधिकार सिडकोकडेच आहेत. हे सर्व नोड लवकरच पालिकेकडे हस्तांतरित होतील त्यामुळे एटूची कामे पालिकेमार्फत बंद झाल्यास याठिकाणी पालिका प्रशासन व प्रकल्पग्रस्त ठेकेदार या नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
तीन लाखांपर्यंतच्या कामासाठी ई-निविदा
By admin | Published: June 08, 2017 2:55 AM