अकोला : काही कारणास्तव गाडी रद्द झाल्यास, प्रतीक्षा यादीतील ई-तिकीटधारकांप्रमाणे कन्फर्म व आरएसी ई-तिकीटधारकांनादेखील त्यांच्या तिकिटाच्या रकमेचा परतावा त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी लवकरच सुरू केली जाणार असल्याची माहिती रेल्वे अधिकार्यांनी दिली. आरक्षण तिकीट खिडक्यांसमोरील गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने ऑनलाइन ई-तिकीट बुकिंगची सुविधा प्रवाशांना उपलब्ध करून दिली; मात्र काही कारणास्तव गाडी रद्द झाल्यास, ऑनलाइन ई-तिकीट बुक करणार्या प्रवाशांना तिकिटाचा परतावा मिळविण्यासाठी तिकीट खिडक्यांवर प्रत्यक्ष जाऊन टीडीआर भरून परतावा मिळवावा लागतो. प्रवासाचे नियोजन चुकल्यामुळे अगोदरच मनस्ताप सहन करणार्या प्रवाशांची तिकिटाचा परतावा मिळविताना दमछाक होऊ नये, यासाठी हा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार गाडी रद्द झाल्यास, ऑनलाइन ई-तिकीट बुक केलेल्या प्रवाशांच्या खात्यात तिकिटाची रक्कम आपोआप जमा होणार आहे. यापूर्वी ही सुविधा केवळ प्रतीक्षा यादीत असलेल्या ई-तिकीटधारक प्रवाशांनाच मिळत होती. लवकरच ही सुविधा कन्फर्म आणि आरएसी ई-तिकीटधारकांसाठीदेखील सुरू होणार आहे.
रेल्वे रद्द झाल्यास ई-तिकीटचा परतावा खात्यात जमा!
By admin | Published: July 03, 2015 11:23 PM