मुंबई : टोल नाक्यावरील खोळंबा टाळणे, इंधन बचत आणि पारदर्शक वसुलीसाठी देशभरात लवकरच ई-टोल सेवा सुरू करण्यात येईल, असे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे सांगितले. मुंबई-दिल्ली महामार्गावर ही सुविधा येत्या एप्रिलपासून सुरू करण्यात येईल, असे ते म्हणाले.बीकेसीतील मेक इन इंडिया सप्ताहात गडकरी म्हणाले की, ई-टोलसाठी वाहनावरच ई-स्टिकरचा वापर करण्यात येईल. वेगवेगळ्या बँकांमार्फत ई-स्टिकर खरेदी करता येतील. काही बँकांशी याबाबत चर्चा झाली असून, त्यांनी ही सेवा देण्यास होकार दिला आहे. महानगरांमधील वाहनांचे प्रदूषण लक्षात घेता बहुतेक महानगरांच्या सीमेवर ३५० वाहनतळे उभारण्यात येणार आहेत. या ठिकाणी पेट्रोलपंप ते कोल्ड स्टोरेजच्या सुविधा उपलब्ध राहतील, असेही त्यांनी सांगितले. गडकरी सलग दोन दिवस मेक इन इंडिया सप्ताहातील कार्यक्र मात सहभागी होत असून, देश-विदेशातील प्रतिनिधींशी बैठका घेऊन गुंतवणुकीबाबत चर्चा करीत आहेत. दोन दिवसांत रस्ते वाहतुकीसाठी किती गुंतवणूक आली असे विचारले असता ते म्हणाले, रस्ते, जल वाहतूक, बंदरे यासाठी केंद्र सरकारच्या विविध योजना असून, अनेक गुंतवणूकदार यासाठी पुढे आले आहेत. याची आकडेवारी लवकरच जाहीर केली जाईल.सध्या प्रश्न गुंतवणुकीचा नाही. पैसा प्रचंड आहे. एखादी चांगली योजना पुढे आणली की गुंतवणूक करण्यास अनेक कंपन्या पुढे येतात. रोजगार उपलब्ध करायचा असेल तर तुम्हाला गुंतवणूक वाढवावी लागणार आणि तेच आम्ही करीत आहोत.
देशभरात लवकरच सुरू होणार ई-टोल सेवा
By admin | Published: February 17, 2016 3:30 AM