रामटेक : पर्यावरणाचा समतोल कायम राखण्यासाठी वृक्षलागवड करणे गरजेचे आहे. केवळ वनविभागावर हे काम न सोडता प्रत्येक नागरिकाने किमान एक तरी झाड लावावे आणि त्याचे संगोपन करावे, असे आवाहन राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. वनविभाग, सामाजिक वनीकरण संचालनालय व ग्रीन अर्थ आॅर्गनायझेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘वृक्षदिंडी यात्रे’चा प्रारंभ मुनगंटीवर यांच्या हस्ते करण्यात आलो. रामटेक शहरातील सुपर मार्केटच्या प्रांगणात सोमवारी झालेल्या या सोहळ्याला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, खा. अजय संचेती, यांच्यासह आमदार आणि मान्यवर उपस्थित होते. मुनगंटीवार म्हणाले की, ‘झाडांपासून सर्वच जातीधर्माच्या माणसाला प्राणवायू मिळतो. सध्या माणसे गरमीपासून दिलासा मिळावा म्हणून ‘एसी’ वापरतात. त्यासाठी विजेच्या बिलाचा भरणा करतात. दुसरीकडे एक रोपटे फुकट मिळेल काय, अशी विचारणा करतात. हे योग्य नाही. आपण सावली मिळावी, म्हणून झाड शोधतो, पण झाड लावण्याचा कधीच विचार करीत नाही. नागरिकांनी मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करून रोपट्यांचे योग्य संगोपन केल्यास सर्वांचे आरोग्य चांगले राहील. त्यामुळे नागरिकांनी वृक्षलागवड करावी.’ पालकमंत्री बावनकुळे यांनी वीज वितरण विभागाद्वारे ५० हजार रोपट्यांची लागवड करण्याची ग्वाही दिली. ना. राजकुमार बडोले यांनी प्रत्येकाने वृक्षारोपण व रोपट्यांचे संगोपन करण्याचे आवाहन केले. (प्रतिनिधी)
प्रत्येकाने किमान एक झाड लावावे
By admin | Published: June 21, 2016 4:11 AM