पुणे : आपले दैनिक प्रसिद्ध होते, ते वाचता का? सरकारी योजनांची पुस्तके प्रकाशित होत आहेत, ती कधी वाचली का? सगळ्या जिल्ह्यांमध्ये फिरलो, एकाही पदाधिकाऱ्याच्या घरावर पक्षाची पाटी दिसली नाही, ती लावायची लाज वाटते का? स्वत:ला बदला, समाजकारण करा, जमिनीवरच्या माणसांबरोबर राहा.भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांवर प्रश्नांची व सूचनांची अशी सरबत्ती करीत, त्यांचे कान पिळले. त्यांच्या या शाब्दिक हल्ल्याने पदाधिकारी हबकून गेले. जिल्हाध्यक्षांचे मुंबईदौरे बंद करा, अशी सूचना करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर कडी केली. बालगंधर्व रंगमंदिरात झालेल्या या दोन दिवसांच्या बैठकीत फडणवीस यांच्यापासून केंद्रीय मंत्री गडकरी यांच्यापर्यंत व दानवेंपासून ते पक्षाच्या महाराष्ट्र प्रभारी सरोज पांडे यांच्यापर्यंत सर्वांनीच पदाधिकाऱ्यांची हजेरी घेतली. कार्यकारिणी बैठक संपून दोन दिवस झाल्यानंतरही पदाधिकाऱ्यांत नेत्यांनी दिलेल्या कानपिचक्यांचीच चर्चा आहे. सरकारी योजनांची पुस्तिका वाचली का, असे एकाला विचारले. वाचून सांगतो, असे तो म्हणाला. असे असेल तर तुम्ही जनतेला कशाची माहिती देणार? आपल्या पदाची पाटी घरावर लावायला तुम्हाला लाज वाटते का? पक्षाच्या नेत्यांची अनेक पुस्तके आहेत. त्याचे वाचन करा, व्यासंग वाढवा. बोलता आले पाहिजे, सांगता आले पाहिजे. त्यासाठी अभ्यास करायला हवा, तो करताना कोणीच दिसत नाही, अशी खंत व्यक्त करीत दानवे यांनी यापुढे असे चालणार नाही, असा दम दिला.(प्रतिनिधी)
नेत्यांनी पिळले पदाधिकाऱ्यांचे कान
By admin | Published: June 23, 2016 2:03 AM