मुंबई : केंद्र व राज्य सरकारमधील मंत्र्यांची एकापाठोपाठ एक प्रकरणे बाहेर येत असल्याने आधीच अडचणीत सापडलेल्या भाजपाच्या अडचणींत आणखी वाढ होताना दिसत आहे. मुंबई भाजपाचे माजी अध्यक्ष व आमदार राज पुरोहित यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह पक्षाध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धोरणावर टीका करतानाच पक्षाचे आमदार मंगलप्रभात लोढा यांनाही लक्ष्य केल्याने पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यानंतर पक्षात आपण ज्येष्ठ असतानाही मंत्रिपदापासून वंचित ठेवण्यात येत आहे, यामागे लोढांचे कारस्थान आहे. दिवंगत प्रमोद महाजनांचा सारा पैसा बिल्डर लोढांनी लाटला असून, ते पक्षाला कोट्यवधींचा पैसा पुरवत असल्याने कोणीच काही बोलत नाही. संघ आणि भाजपाच्या नेतृत्वावर त्यांच्या पैशाचा प्रभाव आहे, असा आरोप पुरोहित यांनी या स्टिंगमध्ये केला आहे. एकीकडे नरेंद्र मोदी चांगले काम करीत असले तरी त्यांच्याच निर्णयामुळे भाजपाचा सहानुभूतीदार व्यापारीवर्ग दुखावला जात आहे. काळा पैसा रोखण्याच्या नावाखाली व्यापार करणेच जिकिरीचे बनविले जात आहे, असा आरोपही पुरोहित यांनी केला.
भाजपामध्ये भूकंप!
By admin | Published: June 27, 2015 2:53 AM