पुणे : नेपाळमधील श्री तारकेश्वर या भूकंपग्रस्त भागात १२० भूकंपरोधक घरे तसेच दोन शाळा बांधण्याचा निर्णय विश्वशांती केंद्र, आळंदी आणि माईर्स एमआयटी या संस्थेने घेतला आहे. पुढील दोन ते तीन महिन्यांत ही घरे व शाळा उभारण्याचे नियोजन आहे. नेपाळ सरकारनेही त्यासाठी मान्यता दिली असल्याची माहिती एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड यांनी दिली.विश्वशांती केंद्र व एमआयटीच्या नऊ सदस्यांच्या शिष्टमंडळाने नुकतीच नेपाळला भेट दिली. यावेळी नेपाळचे पंतप्रधान सुशील कोईराला आणि राष्ट्रपती राम बरन यादव यांची भेट घेण्यात आली. यावेळी शिष्टमंडळाच्यावतीने त्यांच्यासमोर घरे व शाळा बांधण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. संत ज्ञानेश्वर-विश्वशांतीनगर आणि संत तुकाराम-विश्वशांतीनगर अशी नावे तेथील दोन वसाहतींना दिली जाणार आहेत. तसेच अनाथ मुलांच्या शिक्षणासाठी विश्वशांती गुरूकुल या नावाने निवासी शाळा बांधण्याचा प्रस्तावही मान्य करण्यात आला आहे.
नेपाळमध्ये भूकंपरोधक घरे
By admin | Published: June 28, 2015 2:13 AM