सारे कोल्हापूरकर, विजापूरकर झोपेत असताना गेल्या ४८ तासांत दोनदा भूकंपाचे झटके बसले आहेत. याच काळात जम्मू काश्मीरपर्यंत जमीन हादरली आहे. एवढेच नाही तर अफगानिस्तानमध्ये देखील भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
जम्मू काश्मीरच्या कटरामध्ये भूकंपाची तीव्रता 3.4 रिश्टर स्केल होती. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने ही माहिती दिली आहे. जम्मूमध्ये हा धक्का पहाटे 03.28 वाजता जाणवला आहे. जमिनीमध्ये ५ किमी खोलीवर भूकंपाचे केंद्र होते.
कोल्हापूरपासून १७१ किमीवर असलेल्या विजापूरमध्ये आज पहाटे २.२१ वाजता 3.9 तीव्रतेचा भूकंप जाणवला आहे. जमिनीत आतमध्ये १० किमी खोलीवर या भूकंपाचे केंद्र होते. तर गुरुवारी पहाटे १२.०५ वाजता कोल्हापूरमध्ये ३.४ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवला होता, असे एनसीएसने म्हटले आहे.
जम्मू गेल्या चार दिवसांपासून हादरतोय...मंगळवारी जम्मू-काश्मीरच्या कटराला सहा तासांपेक्षा कमी कालावधीत चार भूकंपाचे धक्के बसले. मंगळवारी पहाटे 2:20 वाजता जम्मू-काश्मीरच्या कटरा पूर्वेला पहिला भूकंप झाला. याची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.9 इतकी होती. २.६ रिश्टर स्केलचा दुसरा भूकंप जम्मू प्रदेशातील डोडापासून ९.५ किमी ईशान्येला पहाटे ३.२१ वाजता झाला. पहाटे ३.४४ वाजता जम्मू भागातील उधमपूरपासून २९ किमी पूर्वेला २.८ रिश्टर स्केलचा तिसरा भूकंप झाला. 2.9 रिश्टर स्केलचा चौथा भूकंप सकाळी 8.03 वाजता उधमपूरपासून 26 किमी दक्षिण पूर्वेला झाला.