रायगड: शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 10 दिवसांपूर्वी मला भेटले असा गौप्यस्फोट करून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खळबळ उडवून दिली आहे. या भेटीत दोन्ही नेत्यांदरम्यान राज्यातील सध्याच्या राजकीय स्थितीबाबत चर्चा झाल्याचे पवार यांनी सांगितले. पवार यांच्या निवासस्थानी 10 दिवसांपूर्वी ही भेट झाली. या दोघांच्या भेटीमुळे महाराष्ट्रात लवकरच राजकीय भूकंप होणार असल्याची जोरदार चर्चा आहे.काय चर्चा झाली दोघांमध्ये -10 दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे भेटले. तुमची राजकीय भूमिका काय? असं त्यांनी विचारले, त्यावर मी, ‘तुम्ही तुमची भूमिका जाहीर करा, आम्ही आमची भूमिका जाहीर करतो’ असं त्यांना म्हणालो. सरकारमध्ये राहण्याची उद्धव यांची मानसिकता राहिलेली नाही, असे मला वाटते असं अत्यंत सूचक वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.उद्धव यांना त्यांचा पक्ष महाराष्ट्रात वाढवायचा आहे. भाजपला दूर ठेवून पक्षवाढीसाठी ते प्रयत्नशील आहेत. त्यामुळे ते सरकारमधून बाहेर पडतील, अशी शक्यता पवार यांनी व्यक्त केली. चिंतन शिबीराप्रसंगी येथे पत्रकारांशी अनौपचारिक बोलताना त्यांनी ही माहिती दिली.काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंनी प. बंगालच्या मुख्यमंत्री आणि भाजपाच्या कट्टर विरोधक ममता बॅनर्जी यांची मुंबईत भेट घेतली होती. दुसरीकडे काँग्रेसला रामराम केलेले आणि स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी एनडीएला पाठिंबा दिला आहे. राणेंना सत्तेत सहभागी करून शिवसेनेची कोंडी करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. याशिवाय गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेकडून सामनातून भाजपाविरोधात जोरदार टीका सुरु आहे. त्यामुळे उद्धव-ठाकरे आणि शरद पवार यांच्या भेटीला मोठं राजकीय महत्व आलं आहे.
राजकीय भूकंप? शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये 'सत्ता पे चर्चा', राजकीय घडामोडींना वेग
By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2017 6:06 PM