गजानन मोहोडअमरावती : भूगर्भातील हालचालीमुळे जाणवणारे धक्के व प्रचंड आवाज केवळ मेळघाटातील साद्राबाडीपर्यंत सीमित न राहता मध्यप्रदेशातील देडतलाईपर्यंत जाणवत आहे. ‘एनसीएस’चे पथकप्रमुख कुलवीरसिंग यांनी ही भूकंपाचीच कंपने असल्याचे स्पष्ट केले. साद्राबाडीपासून ३५ किमीच्या परिघात धक्के बसत असल्याने नवी दिल्ली येथील ‘नॅशनल सेंटर फॉर सिस्मोग्रॉफ’ची चमू २५ ऑगस्टपासून ठाण मांडून आहे. २१ ऑगस्टला दिल्ली केंद्रातील सिस्मोग्राफ यंत्रात २.५ रिश्टरस्केल नोंद झाल्याचे त्यांनी सांगितले.धारणी तालुक्यातील साद्राबाडी, झिल्पी, खारी, गावलानडोह, सुसर्दा व राणीपिसा या गावांमध्ये साधारणपणे दोन आठवड्यापासून भूगर्भात हालचाल होत आहे. जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने घेत साद्राबाडी व परिसरातील भूकंपसदृश घटनेचे नेमके कारण व शास्त्रीयदृष्ट्या तपासासाठी ‘जीएसआय’ (जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया) व एनसीएस (नॅशनल सेंटर फॉर सिस्मोग्राफ) च्या पथकास पाचारण केले. राष्ट्रीय स्तरावरील दिल्ली येथील ‘एनसीएस’ या संस्थेच्या तज्ज्ञांचे पथक साद्राबाडीला २४ ऑगस्टपासून ठाण मांडून आहेत. या पथकाद्वारा तीन ठिकाणी ‘सिस्मोग्रॉफ’ यंत्र बसविण्यात आले व या यंत्राद्वारे नोंदी ठेवण्यात येत आहेत. यामध्ये साद्राबाडी येथील धक्के भूकंपाचेच असल्याचे स्पष्ट झाले.
तिव्रता कमी होतेयसाद्राबार्डी व परिसरात २१ ऑगस्टला २.५ रिश्टरस्केलपर्यंत भूकंपाची नोंद झाली. त्यानंतर या धक्क्याची तीव्रता कमी होत आहे. चार दिवसांपूर्वी १.५ रिश्टरस्केल, तर बुधवारी सकाळी १.२ रिश्टरस्केलपर्यंत याची नोंद साद्राबाडी येथे बसविलेल्या सिस्मोग्रॉफ यंत्रावर नोंद झाली. या धक्क्यांची तीव्रता दिवसेंदिवस कमी होत असल्याने घाबरण्याचे कोणतेही कारण नसल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
वरिष्ठ शास्त्रज्ञांशी चर्चेनंतर अहवालसाद्राबाडीतील सिस्मोग्रॉफ यंत्राच्या नोंदीची माहिती ‘एनसीएस’चे विभागप्रमुखांना सादर करण्यात येईल. या नोंदीच्या आधारे वरिष्ठ शास्त्रज्ञांशी चर्चा होईल. यामधून निष्कर्ष येईल त्याचा अहवाल अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात येईल. याला किती अवधी लागेल हे नेमके आता सांगता येणार नसल्याचे बलवीरसिंह यांनी सांगितले.
धोकादायक घरांना लाल मार्किंगसाद्राबार्डीत आता स्थिती पुर्ववत झालेली आहे. नागरिक दैनंदिन व्यवहार करू लागले आहेत. विद्यार्थी देखील शाळेत जात आहेत झिल्पी व गावलानडोह येथे प्रत्येकी एक वॉटरप्रुफ तंबू उभारण्यात आलेला आहे. धक्क्यांमुळे ज्या घरांना भेगा पडल्या व धोका आहे. अशा घरांचा सर्वे सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारा करण्यात आला. धोकादायक घरांना लाल मार्कींग करण्यात आले, त्या घरांमध्ये नागरिकांना रात्री राहण्यास मज्जाव केला जात असल्याचे तहसीलदार आदिनाथ गांजरे यांनी सांगितले.