वर्धा - सिंदी (मेघे) परिसरात शनिवारी झालेल्या मिनी गॅस सिलिंडरच्या स्फोटाने धक्कादायक वास्तव पुढे आले. स्फोटक बनलेल्या या मिनी सिलिंडरच्या विक्रीबाबत कोणतेही तारतम्य नाही. ‘कोणीही कुणालाही विका’ असा काहीसा प्रकार वर्धेत बिनदिक्कतपणे सुरू आहे. जीवनावश्यक वस्तूत मोडत असलेल्या मिनी सिलिंडरच्या विक्रीची कुठलीही नोंद जिल्हा प्रशासनाकडे नसल्याचे ‘लोकमत’च्या पाहणीत समोर आले आहे. यामुळे स्फोटके बणू पाहत असलेल्या मिनी सिलिंडरच्या सुरू असलेल्या खुल्या काळाबाजावरावर प्रतिबंध लावणे गरजेचे झाले आहे.
वर्धेत सिंदी (मेघे) परिसरातील स्वास्तिक कॉलनी येथे अशाच पाच किलो वजनाच्या मिनी सिलिंडरचा स्फोट झाला. यात पाच जण जखमी झाले. दोघे गंभीर आहेत. या स्फोटात वापरल्या गेलेले सिलिंडर कोणत्या कंपनीचे याची कुठेच नोंद नाही. हे सिलिंडर कुठून आणले याची माहितीही नाही. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला तरी त्याचा विक्रेता कोण याची माहिती त्यांच्याकडे नाही. ती तपासात समोर येईल असे पोलीस विभागाकडून सांगण्यात आले असले तरी याची गंभीरता वाढत आहे.
वर्धेतील स्फोटात कोणती प्राणहाणी झाली नाही. मात्र सिलिंडर कोणत्या कंपनीचे, ते कुठून आले याची कुठलीही नोंद नसल्याने या घटनेची सर्वस्वी जबाबदारी ते वापरणाऱ्यावर येत आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाने अशा सिलिंडर विक्रीच्या दुकानांची तपासणी करण्याची गरज निर्माण झाली आहे. शहरात सुरू असलेल्या या मिनी बॉम्बच्या खुल्या विक्रीवर आळा घालण्याकरिता जिल्हा प्रशासनाकडून कारवाई होणे अपेक्षित आहे.
अनेक इमारतीत मिनी सिलिंडरचा अवैध साठा -
गॅस सिलिंडर ते कोणतेही असो छोटे वा मोठे त्याचा साठा करण्याकरिता शासनाच्या संबंधीत विभागाची परवानगी असणे अनिवार्य आहे. वर्धेत भर शहरात अशा सिलिंडरची विक्री होत असून त्याच दुकानात त्याचा साठा करण्यात येत आहे. यातून एखादी भीषण घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या प्रकाराकडे जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
शासन दरबारी कुठलीही नोंद नाही-
वर्धा शहरात व जिल्ह्यात अशा मिनी सिलिंडरची अनेक दुकानात विक्री होत आहे. ही वस्तू जीवनावश्यक असल्याने तिची नोंद शासन दरबारी होणे अपेक्षित आहे. मात्र येथील जिल्हा पुरवठा विभागात या मिनी सिलिंडर विक्रीची कुठलीही नोंद नाही. वर्धेत अशी किती केंद्रे आहेत याची कुठचीही नोंद त्यांच्याकडे नसल्याचे सांगण्यात आहे.
गॅस शेगडी दुरूस्तीच्या दुकानातून सिलिंडर विक्री -
वर्धेत गॅस शेगडी दुरूस्तीची अनेक दुकाने आहेत. या दुकानातून मोठ्या प्रमाणात या मिनी सिलिंडरची विक्री होत असल्याची माहिती पुरवठा विभागाला आहे. मात्र अशा दुकानांवर चौकशी करीत आजपर्यंत एकही वेळा त्यांच्याकडून कारवाई करण्यात आली नाही.
पुरवठा विभागाकडे एकही तक्रार नाही -
जिल्ह्यात होत असलेल्या या मिनी गॅस सिलिंडरच्या विक्रीबाबत जिल्हा पुरवठा विभागाकडे आजपर्यंत एकही तक्रार आली नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. यामुळे मिनी सिलिंडरच्या रूपात असलेल्या या स्फोटकाच्या विक्रीला वर्धेकरांची मंजुरी तर नाही ना, असा सवाल समोर येत आहे.
भाडेकरूंसह व्यावसायिकांकडून वापर -
वर्धा शहरासह जिल्ह्यात वापरल्या जात असलेल्या या मिनी सिलिंडरचा वापर भाड्याने वास्तव्यास असलेल्यांसह काही व्यावसायिकांकडून होत आहे. भाडेकऱ्यांना सिलिंडर घेताना आवश्यक कागदपत्र उपलब्ध होत नसल्याने त्यांच्याकडून अशा सिलिंडरचा वापर होत आहे. तसेच चायनिजचा व्ययवसाय करणाऱ्यांसह चहा टपरी, पावभाजी व्यावसायिकांकडूनही या सिलिंडरचा वापर होत आहे. कमी पैशात केव्हाही सहज उपलब्ध होत असल्याने त्यांचा याकडे कल असल्याचे समोर आले आहे.
सबसिडीचा घोळ व काळाबाजार यातून मिनी सिलिंडरचा उदय -
सर्वसामान्याकडे असलेल्या १६ किलो वजनाच्या गॅस सिलिंडरवर शासनाकडून सबसिडीही दिल्या जाते. मात्र या सिलिंडरचा होणारा काळा बाजार व सबसिडी वगळता वाढलेली किंमत यामुळे ग्राहकांकडून गरजेनुसार कमी वजनाच्या या छोट्या सिलिंडरची मागणी होवू लागली. यातूनच अनेक खासगी कंपन्यांनी या व्यवसायात उडी घेतली. शासन मान्य असलेल्या सिलिंडरच्या स्पर्धेत त्यांनीही आपले सिलिंडर आणले. ते आज बाजारात दुकानादुकानात विकल्या जात असून यातून धोका निर्माण झाला आहे.
शहरात व जिल्ह्यात सुरू असलेल्या मिनी सिलिंडरच्या विक्रीबाबत जिल्हा पुरवठा विभागाकडे कुठलीही माहिती नाही. या विक्रेत्यांनी कार्यालयात परवानगी बाबत कुठलाही अर्ज दिला नाही. शिवाय त्यांच्या व्यवसायाची माहितीही दिली नाही. आतापर्यंत जिल्ह्यातून एकही तक्रार पुरवठा विभागाकडे आली नाही. त्यामुळे या संदर्भात कधी चौकशी करण्यात आली नाही. या मिनी सिलिंडरच्या विक्रीच्या परवानगीबाबत विभागीय स्तरावर निर्णय घेतल्या जात असल्याने जिन्हा पुरवठा विभागाकडून विशेष कारवाई होत नाही.
- अनिल बन्सोड, जिल्हा पुरवठा अधिकारी, वर्धा.
त्या स्फोटाची तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्याची चौकशी सुरू आहे. या घटनेत वापरण्यात आलेले सिलिंडर कोणत्या कंपनीचे याचा खुलासा होणे बाकी आहे. या सिलिंडर विक्रीची परवानगी नसलेल्या विक्रेत्यांकडून हे सिलिंडर घेतलेल्याचे समोर आल्यास त्या व्यावसायिकावरही गुन्हा दाखल करण्यात येईल.
- अंकित गोयल, जिल्हा पोलीस अधीक्षक, वर्धा.