- गणेश आहेर
लोणी (जि. अहमदनगर) : चांगल्या आरोग्यासाठी गैरमार्गाने नव्हे, तर कष्टाने कमावलेले खा, असे चरक संहितेमधील पोपटाने सांगितले होते. आजच्या काळात मात्र हे कसले पोपट जन्मले आहेत, काय माहिती?, असा सवाल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केला. पोपटाची कथा सांगण्यामागे राज्यपालांचा रोख नेमका कोणाकडे होता? याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.लोणी येथील प्रवरा मेडिकल ट्रस्ट, प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सच्या प्रवरा आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय व डॉ. बाळासाहेब विखे पाटील रिसर्च सेंटरचा भूमिपूजन कार्यक्रम बुधवारी राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते झाला. समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे-पाटील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, आदी उपस्थित होते.राज्यपालांनी आपल्या भाषणात चरक यांच्या पोपटाची गोष्ट सांगितली. एकदा एक व्यक्ती चरक यांच्याकडे गेली. चांगल्या आरोग्यासाठी काय करावे, असा सल्ला विचारल्यावर चरक यांनी हे आपल्या पोपटाला विचारा, असे सांगितले. पोपटाने त्यांना सल्ला दिला की, ‘चांगल्या स्वास्थ्यासाठी हित भूक, मित भूक आणि रीत भूक महत्त्वाची आहे. म्हणजे चांगले आणि पचेल तेच खा, थोडे आणि योग्य तेच खावे आणि गैरमार्गाने नव्हे, तर कष्टाने कमावलेले खावे.’ गोष्ट सांगितल्यावर राज्यपाल म्हणाले, ‘आजच्या काळात हे कसले पोपट जन्मलेत?’