लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: उद्धव ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेले भाजप नेते नारायण राणे यांच्या निवडीला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. राऊत यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयाने राणे यांना शुक्रवारी समन्स बजावले.
नारायण राणे यांनी पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढवली. त्यात त्यांनी विनायक राऊत यांचा ४७,८५८ मतांनी पराभव केला. राऊत यांनी गेल्या महिन्यात ॲड. असीम सरोदे यांच्यामार्फत नारायण राणे यांच्या निवडणुकीला आव्हान देणारी याचिका दाखल केली. राणे यांनी फसवणूक करून निवडणूक जिंकल्याने त्यांची रत्नागिरी- सिंधुदुर्ग मतदारसंघातील निवडणूक रद्द करावी, अशी मागणी राऊत यांनी याचिकेद्वारे केली आहे.
न्या. सारंग कोतवाल यांच्या एकलपीठाने राणे यांना समन्स बजावत त्यांना याचिकेवर उत्तर देण्याचे निर्देश दिले आणि याचिकेवरील पुढील सुनावणी १२ सप्टेंबर रोजी ठेवली. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाची नव्याने निवडणूक घेण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाला द्यावेत, अशीही मागणी राऊत यांनी केली आहे.
निवडणूक प्रचार संपल्यानंतर एक व्हिडीओ समोर आला. त्यात राणे समर्थक मतदारांना पैसे वाटत आहेत आणि ईव्हीएमवर भाजपचे चिन्ह असलेले बटण दाबण्यास सांगत आहे, असा दावा राऊत यांनी केला आहे. या व्हिडिओची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र समिती नेमावी, अशी मागणी राऊत यांनी केली आहे.