अकोला : विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पर्यावरणपूरक धूलिवंदनाची संकल्पना सामाजिक वनीकरण विभागाच्यावतीने राबविण्यात येत आहे. यासाठी प्रत्येक शाळेत व घरोघरी नैसर्गिक रंग वापरून पर्यावरणपूरक होळी साजरी करण्याच्या सूचना सामाजिक वनीकरण विभागाने राष्ट्रीय हरित सेनेच्या विद्यार्थ्यांना केल्या आहेत. सामाजिक वनीकरण विभागाच्यावतीने शाळांमध्ये राष्ट्रीय हरित सेना स्थापन करण्यात आली आहे. पाचवी ते दहाव्या वर्गात प्रवेशित विद्यार्थ्यांची तुकडी तयार करून त्या माध्यमातून सामाजिक वनीकरण विभाग विविध उपक्रम राबवत असते. पर्यावरणपूरक धूलिवंदनासाठी गत एक महिन्यापासून राष्ट्रीय हरित सेनेच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत. याकरिता नैसर्गिक रंग बनविण्यात आले आहेत. पर्यावरणातीलच विविध वस्तूंपासून नैसर्गिक रंग तयार करण्याचे प्रशिक्षणही विद्यार्थ्यांना देण्यात आले आहे तसेच पर्यावरणपूरक नैसर्गिक होळी साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विद्यार्थीच मोठय़ा प्रमाणात धूलिवंदन साजरा करतात तसेच रासायनिक रंगांचा धोका त्यांच्याच त्वचेला अधिक असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या हिताकरिता सामाजिक वनीकरण विभागाने पर्यावरणपूरक धूलिवंदनासाठी पुढाकार घेतला आहे. सामाजिक वनीकरण विभागाचे माहिती व प्रसिद्धीप्रमुख गोविंद पांडे यांनी राष्ट्रीय हरितसेनेद्वारे लहान मुलांमध्येच नैसर्गिक रंगांचा वापर करण्याबाबत जनजागृती करीत असल्याचे सांगीतले. प्रत्येक शाळेत पर्यावरणपूरक होळी साजरी व्हावी, हाच आमचा उद्देश आहे. तशा प्रकारच्या सूचना शाळांना देण्यात आल्या आहेत. *असे तयार करता येतात रंग काळा रंग : आवळ्याचा किस लोखंडी तव्यावर टाकूून त्यामध्ये पाणी टाकून उकळले असता, गडद काळा रंग तयार होतो. नारिंगी रंग : बेलफळाचा गर पाण्यात टाकून उकळला असता, नारिंगी रंग तयार होतो. लाल रंग : पळसाची फुले सावलीत वाळवल्यानंतर पाण्यात उकळल्यास लाल रंग तयार होतो.पिवळा रंग : बेलफळाची साल पाण्यात टाकून उकळली असता ,आकर्षक पिवळा रंग तयार होतो. जांभळा रंग : बीट या कंदाच्या टाकाऊ सालीपासून आकर्षक जांभळा रंग तयार होतो.
राष्ट्रीय हरित सेनेकडून शाळांमध्ये होणार पर्यावरणपूरक धूलिवंदन
By admin | Published: March 06, 2015 1:39 AM