पुणे : टाकाऊ वस्तूंपासून बनविलेली मगर, हरीण आदी प्राणी व पक्षी, एखाद्या जंगलाप्रमाणे केलेली सजावट एकप्रकारे जंगल सफरच घडवून आणते. प्रसिद्ध कला दिग्दर्शक सुकांत पाणिग्रही व त्यांच्या देश-विदेशातील सहकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हँडमेड पेपर इन्स्टिट्यूट, पेपरटेल्स हा पर्यावरणपूरक, पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारा गणेशोत्सव साजरा करत आहे.प्राणी, पक्षी व इतर सजीवसृष्टी गणपती बाप्पाकडे पर्यावरणाच्या रक्षणाचे साकडे घालत असल्याचे चित्र या गणेशोत्सवाच्या सजावटीतून दाखवण्यात आले आहे. शिवाजीनगर येथील कृषी महाविद्यालया शेजारील हँडमेड पेपर इन्स्टिट्यूट व पेपरटेल्सच्या आवारात हा पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारा गणेशोत्सव साजरा होत आहे. यामध्ये हँडमेड पेपरवर थ्री-डीमध्ये तयार केलेली वाघ, हत्ती आदी प्राणी व पक्ष्यांची चित्रे ठेवण्यात आली आहेत. तसेच, टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तूंची निर्मिती व त्यासंदर्भातील जनजागृतीचा ‘अनडू’ हा उपक्रम भारतीय चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध कला दिग्दर्शक सुकांत पाणिग्रही यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. शीतपेयांच्या मोकळ्या सुमारे २ हजार कॅनपासून हत्ती तयार करण्यात आला आहे.टाकाऊपासून टिकाऊ वस्तूंची निर्मिती कशी करता येते आणि त्यातून पर्यावरणाचे रक्षण कसे होते, यासंदर्भात वस्तूंचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. नागरिकांना पर्यावरणपूरक उपक्रमांची उदाहरणांसह माहिती मिळणार आहे, असे हँडमेड पेपर इन्स्टिट्यूट व पेपरटेल्सचे प्रमुख जीतेंद्र सोनार यांनी सांगितले. पाणिग्रही म्हणाले, ‘संपूर्ण जगात हा प्रकल्प राबविला जावा, यासाठी ‘हाउ टू व्हिव अ डेथ डेल्टा’ यांच्या विद्यार्थी प्रतिनिधींकडून प्रयत्न सुरु आहेत. स्वच्छता ठेवण्यासाठी कोणी एकाने नाही, तर सर्वांनीच हातभार लावला पाहिजे.’ या प्रकल्पाची सुरुवात २ महिन्यांपूर्वी करण्यात आली आहे. यामध्ये देश-विदेशातील कलाकार सहभागी झाले आहेत. >उपक्रम, जनजागृतीचा जागर चालणार वर्षभर टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तूंची निर्मिती करण्याबरोबरच पर्यावरणाचे महत्त्व विशद करणारा आणि त्याच्या रक्षणासाठी वर्षभर विविध कलांच्या माध्यमातून जनजागृती करणारा ‘अनडू’ कार्यक्रम संपूर्ण वर्षभर राबवण्याची तयारी हँडमेड पेपर इन्स्टिट्यूट व पेपरटेल्सच्या आवारात झाली आहे.
पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2016 1:07 AM